लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : केंद्र सरकार तसेच उद्योगपती गौतम अदानींवर झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांविरोधात दोनापावला येथील राजभवनवर काढलेल्या धडक मोर्चावेळी विरोधी पक्षनेता युरी आलेमाव, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पणजी पोलिसांनी ताब्यात घेतले.
उद्योगपती गौतम अदानी, तसेच त्यांच्या सहकाऱ्यांवर अमेरिकेत झालेल्या कथिक भ्रष्टाचाराच्या आरोपांविरोधात प्रदेश काँग्रेसने बुधवारी सकाळी राजभवनवर धडक मोर्चा काढला. त्यानुसार विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांच्यासह अन्य पदाधिकारी तिथे जमले होते. राजभवनच्या दिशेने जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्र सरकार व अदानींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने अदानीने गोव्याला कोळसा हब बनवले आहे. सरकार जनतेच्या जिवाशी खेळत आहे. याविरोधात आवाज उठवल्यानेच पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतले, असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला.
सरकारची हुकूमशाही प्रदेशाध्यक्ष
पाटकर म्हणाले, अदानीविरोधात जेव्हा विरोधी पक्ष आवाज उठवतात, आंदोलन करतात, तेव्हा मोदी सरकार पोलिसांना पुढे करून विरोधकांवर कारवाई करायला लावते. सरकार विरोधकांचा आवाज दाबू पाहत आहे. त्यांच्यावर अन्याय करते. अदानी व त्यांच्या सहकाऱ्यांवर अमेरिकेत भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. तरीसुद्धा केंद्र सरकार अदानी यांना पाठी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला.