तेलगोळ्यांमुळे गोव्याची किनारपट्टी काळवंडली!
By Admin | Updated: June 8, 2015 01:12 IST2015-06-08T01:12:55+5:302015-06-08T01:12:55+5:30
गोवा किनारपट्टीला सतावणारे तेल तवंग अर्थात तेलगोळे पुन्हा एकदा दक्षिण गोव्यातील किनारपट्टीवर दिसू लागले आहेत.

तेलगोळ्यांमुळे गोव्याची किनारपट्टी काळवंडली!
सुशांत कुंकळयेकर, मडगाव
गोवा किनारपट्टीला सतावणारे तेल तवंग अर्थात तेलगोळे पुन्हा एकदा दक्षिण गोव्यातील किनारपट्टीवर दिसू लागले आहेत. त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांत चिंतेचे वातावरण आहे. पावसापूर्वी गोव्यात शेवटचा पर्यटन हंगाम संपत असताना तेलगोळ््यांनी समुद्रकिनारे व्यापल्याने पर्यटकांनीही किनाऱ्यांकडे पाठ फिरवली आहे.
दक्षिण गोव्यात वार्का व मोबोर या दोन किनाऱ्यांवर ३ आणि ४ जूनला तेलाचे गोळे आले होते. याच पट्ट्यात तब्बल सात तारांकित हॉटेल्स आहेत. त्यामुळे हॉटेल्समधील पर्यटकांना किनाऱ्यावर जाणे अडचणीचे झाले आहे. गोव्यात दरवर्षी पावसाळ््यात किनाऱ्यावर तेलगोळे येतात. मागील वर्षी त्यामुळे उत्तर गोव्याची किनारपट्टी काळवंडली होती. संसदेतही हा प्रश्न गाजला होता. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी तेलगोळ््यांची राष्ट्रीय पातळीवर चाचणी घेतली जाईल, असे सांगितले होते.
तेल गोळ््याच्या समस्येवर सध्या पर्यावरण क्षेत्रातील ‘टेरी’ व समुद्र विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या ‘एनआयओ’च्या शास्त्रज्ञांनी संशोधन सुरू केले आहे. तेल गोळ््यांचे नमुने या दोन्ही संस्थांच्या शास्त्रज्ञांनी जमा केल्याची माहिती गोवा प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष जुझे मान्युएल नोरोन्हा यांनी दिली.
गोव्यातील ‘एनआयओ’ने केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सहाय्याने तीन कोटी आठ लाख खर्चून संशोधनासाठी प्रयोगशाळा उभारली आहे. किनारे स्वच्छ ठेवण्याचे काम एका खासगी कंपनीला दिले आहे.
-------
गोव्यात दरवर्षी समुद्रकिनाऱ्यावर तेलगोळे येतात. समुद्रात जहाजातून तेलाची गळती होते, त्यामुळे ही समस्या निर्माण होते. पावसाळ््यापूर्वी हा तवंग पाण्यावर पसरतो आणि त्यात वाळू मिसळल्याने त्याचे गोळे होतात. त्यावर उपाययोजना करण्यासाठी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने आराखडाही तयार केला आहे.
- जुझे मान्युएल नोरोन्हा अध्यक्ष, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ