मोहन रानडे यांचं जीवन सर्वांसाठीच प्रेरणादायी; मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 11:45 AM2019-06-25T11:45:12+5:302019-06-25T11:47:09+5:30

गोवा मुक्तीसंग्रामात योगदान देणाऱ्या मोहन रानडे यांचं 90 व्या वर्षी निधन

goa cm pramod sawant pays tribute to freedom fighter mohan ranade | मोहन रानडे यांचं जीवन सर्वांसाठीच प्रेरणादायी; मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

मोहन रानडे यांचं जीवन सर्वांसाठीच प्रेरणादायी; मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

Next

पणजी : ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी पद्मश्री मोहन रानडे यांचे जीवन आम्हा सर्वांसाठीच प्रेरणादायी होते व आहे, अशा शब्दांत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रानडे यांच्याविषयी आपल्या भावना मंगळवारी सकाळी व्यक्त केल्या. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात रानडे यांनी आज अखेरचा श्वास घेतला. ते 90 वर्षांचे होते. काही महिन्यांपासून त्यांना अन्न नलिकेच्या विकाराचा त्रास सुरू होता. तसेच त्यांच्या शरीरातील हिमोग्लोबीनदेखील कमी झाले होते. 




रानडे यांच्या निधनाची माहिती समजल्यानंतर लगेच मुख्यमंत्री सावंत यांनी ट्विट करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली. 'गोवा मुक्ती लढ्यात रानडे यांनी खूपच मोठे योगदान दिले. गोव्याला पोर्तुगीजांच्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी खूप त्रास सहन केला. हालअपेष्टा भोगल्या,' अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी रानडे यांना आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, गोवा व पोर्तुगालच्या तुरुंगात रानडे यांनी चौदा वर्षे घालवली. रानडे यांचा त्याग आणि संघर्ष गोवा राज्य कधीच विसरणार नाही. रानडे यांनी आपले पूर्ण जीवन समाजाच्या सेवेसाठी दिले. रानडे यांच्या कुटूंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.'




गोव्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनीही रानडे यांच्या निधनाविषयी दु:ख व्यक्त केले. रानडे यांच्या निधनाचे वृत्त ऐकून वाईट वाटले. ओम शांती, असे वेलिंगकर म्हणाले. सोशल मीडियावरून अनेकांनी रानडे यांना श्रद्धांजली वाहिली. रानडे यांच्यासारख्या स्वातंत्र्यवीरांमुळेच आम्हा गोमंतकीयांना स्वातंत्र्य मिळाले, अशा शब्दांत अनेक गोमंतकीयांनी फेसबुकवरून आपल्या भावना व्यक्त केल्या.
रानडे यांच्या निधनाने झालेले नुकसान कधीही भरून येणार नाही. रानडे यांच्यावर कला आणि संस्कृती खात्याच्या सहकार्याने तयार करण्यात आलेला माहितीपट लवकरच सर्व शाळांमध्ये दाखवून नव्या पिढीपर्यंत रानडे यांचे योगदान पोहचवले जाईल, असे गोव्याचे कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनीही श्रद्धांजली वाहिली. रानडे यांचे गोवा मुक्ती लढ्यातील योगदान अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. मला त्यांच्या निधनाचे दु:ख ऐकून खूप वाईट वाटले, असे कामत म्हणाले.

Web Title: goa cm pramod sawant pays tribute to freedom fighter mohan ranade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.