गोवा भाजपाला 20 डिसेंबरपर्यंत नवे प्रदेशाध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 02:27 PM2019-11-29T14:27:25+5:302019-11-29T14:28:28+5:30

पक्ष पातळीवर पूर्वतयारी सुरू

Goa BJP will get new state president till December 20 | गोवा भाजपाला 20 डिसेंबरपर्यंत नवे प्रदेशाध्यक्ष

गोवा भाजपाला 20 डिसेंबरपर्यंत नवे प्रदेशाध्यक्ष

Next

पणजी : गोव्यातील भाजपसाठी नवे प्रदेशाध्यक्ष येत्या 20 डिसेंबर्पयत निवडले जाणार आहेत. त्याबाबतची पूर्वतयारी सध्या पक्ष पातळीवर सुरू आहे.

सध्या विनय तेंडुलकर यांच्याकडे भाजपचे प्रदेशाध्यक्षपद आहे. तेंडुलकर हे राज्यसभेचेही सदस्य आहेत. तेंडुलकर यांचा प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यकाळ यापूर्वीच संपला आहे. फक्त पर्यायी व्यवस्था होईपर्यंत तेंडुलकर यांच्या हाती प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे ठेवली गेली आहेत. प्रदेशाध्यक्ष या नात्याने तेंडुलकर यांना गोव्यातील भाजपवर स्वत:चा काही खास ठसा उमटवता आला नाही. ते प्रदेशाध्यक्ष असतानाच गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी म्हणजे फेब्रुवारी 2017 साली गोवा भाजपचा मोठा पराभव झाला. भाजपचे केवळ तेरा उमेदवार त्यावेळी निवडून आले होते. मात्र अलीकडे काँग्रेसमधील दोन आमदार दयानंद सोपटे व सुभाष शिरोडकर यांना भाजपमध्ये आणण्यात तसेच मग काँग्रेसमधील दहा आमदार पुन्हा भाजपमध्ये आणण्यात तेंडुलकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. काँग्रेस पक्ष प्रथम फोडला गेला, तेव्हा भाजपचेच एक ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी तेंडुलकर यांना मोठ्या टीकेचे लक्ष्य बनविले होते. पण दिल्लीतील भाजप श्रेष्ठींनी तेंडुलकर यांची याबाबतीत पाठराखण केली. तेंडुलकर यांनी मगो पक्षाचे दोन आमदार फोडून भाजपमध्ये आणण्याचीही कामगिरी बजावली.

आता भाजपचे भावी प्रदेशाध्यक्ष म्हणून माजी आमदार दामू नाईक तसेच माजी मंत्री दिलीप परुळेकर यांची नावे चर्चेत आहेत. त्याचबरोबर गोविंद पर्वतकर आणि सदानंद शेट तानावडे या दोघा भाजप सरचिटणीसांची नावेही पक्षात भावी प्रदेशाध्यक्ष म्हणून चर्चेत आहेत. परुळेकर, दामू नाईक व पर्वतकर हे भंडारी समाजातील आहे. या समाजाची लोकसंख्या गोव्यात जास्त असल्याने याच समाजातील उमेदवार प्रदेशाध्यक्ष पदासाठी निवडला जाईल अशी देखील चर्चा पक्ष संघटनेत सुरू आहे. काँग्रेसकडे भंडारी समाजातील प्रदेशाध्यक्ष असल्यानेही भाजपकडून दामू नाईक किंवा पर्वतकर यांचे नाव प्रदेशाध्यक्ष म्हणून निश्चित केले जाऊ शकते.
 

Web Title: Goa BJP will get new state president till December 20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.