लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजपकडून मंडळ अध्यक्षांची निवड जाहीर होताच शुक्रवारी दोन्ही जिल्हाध्यक्षांचीही नावे निश्चित करण्यात आली आहेत. यात उत्तर गोवा जिल्हाध्यक्षपदी दयानंद कारबोटकर (मये), तर दक्षिण गोवा जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर गावकर (केपे) यांची निवड करण्यात येत असून, आज शनिवारी त्यांच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
शुक्रवारी सकाळी दयानंद कारबोटकर व प्रभाकर गावकर या दोघांनीच अर्ज भरले. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. राज्यातील ३६ मतदारसंघांमध्ये मंडळ अध्यक्षांच्या निवडणुका बिनविरोध झाल्यानंतर आता जिल्हाध्यपदासाठी निवडणुका होणार आहेत. त्यानुसार कारबोटकर व गावकर यांची नावे प्रदेश भाजपने एकमताने मंजूर केली आहेत. हे दोघेही भाजपचे जुने कार्यकर्ते असून, त्यांनी पक्षासाठी बरेच काम केले आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष पदासाठी बाबू कवळेकर, दिलीप परुळेकर, दयानंद मांद्रेकर, माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, माजी आमदार दामू नाईक, दयानंद सोपटे यांच्यासह गोविंद पर्वतकर यांच्या नावावर खलबते सुरू आहेत.
२० दिवसांत नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड
भाजपने यापूर्वी ३६ विधानसभा मतदारसंघांमध्ये मंडळ अध्यक्षांची निवड केली आहे. त्यानंतर उत्तर गोवा व दक्षिण गोवा जिल्हाध्यक्षांची निवड प्रक्रिया पार पडली. आता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची निवड केली जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष पदासाठी सात नावांचा विचार करण्यात आला असून, यातील माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईक व माजी आमदार दामू नाईक या दोघांमध्येच स्पर्धा आहे. पुढील २० दिवसांत भाजपकडून नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा करण्यात येणार आहे.