लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : एक पंचमांश बजेट कर्जावरच खर्च होणार आहे. अर्थसंकल्प अवास्तव आहे, अशी टीका करत सरकारने आजचे मरण उद्यावर ढकलले असल्याची टीका गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारवर केली.
अर्थसंकल्पावरील विधानसभेत चर्चेत बोलताना सरदेसाई म्हणाले की, सरकारने उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी काहीही केलेले नाही. आता कर व शुल्क वाढवून जनतेच्या माथी बोजा टाकला जाईल. वीज बिले वाढवून ग्राहकांच्या खिशाला फटका दिला आहे.
वाढलेली कर्जे, देणी, कमी झालेले केंद्रीय अनुदान, करेतर महसूल, राज्य कर महसूल यावर त्यांनी प्रकाश टाकला. सरदेसाई म्हणाले 'अर्थसंकल्पात प्रमुख महसुलात घट दिसली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे गोवा विकण्याची एक भव्य योजना आहे. अर्थसंकल्पावर चर्चेसाठी गोव्यात भरपूर वेळ दिला जातो, ही चांगली बाब आहे. परंतु, एक अहवाल असेही सांगतो की, गोव्यात घाईने कायदे केले जातात.
चिप्सच्या पाकिटासारखा!
हा अर्थसंकल्प म्हणजे चिप्सच्या पाकिटासारखा आहे. ज्यात चिप्स कमी आणि हवा जास्त असते, असे म्हणत सरदेसाई यांनी सोबत आणलेले चिप्स पाकीट सभागृहात दाखवले. '२०२५-२६ च्या अर्थसंकल्पाकडे पाहताना, लोकांना भीती वाटावी असा हा अर्थसंकल्प आहे. भिवपाची गरज आसा' असे ते म्हणाले.