ग्लास्गोत गोमंतकीय झेंडा!
By Admin | Updated: July 10, 2014 01:26 IST2014-07-10T01:24:47+5:302014-07-10T01:26:57+5:30
पणजी : बुद्धिबळाच्या पटलावरील आव्हानांचे एक-एक घर मागे टाकत गोव्याच्या ‘गोल्डन गर्ल’

ग्लास्गोत गोमंतकीय झेंडा!
पणजी : बुद्धिबळाच्या पटलावरील आव्हानांचे एक-एक घर मागे टाकत गोव्याच्या ‘गोल्डन गर्ल’ भक्ती कुलकर्णीने बुधवारी ग्लास्गो (स्कॉटलॅँड) येथे इतिहास रचला. राष्ट्रकूल बुद्धिबळ स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकाविले. याबरोबरच ती राष्ट्रकूलची भारताची ‘न्यू चॅम्पियन’ ठरली.एवढेच नव्हे, तर ग्लास्गोत जेतेपदाचा झेंडा फडकविणारी ती पहिली गोमंतकीय महिला खेळाडू ठरली.
ग्लास्गो येथील स्पर्धेत भारताच्या भक्तीसह चार अव्वल महिला आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी झाल्या होत्या. त्यात आशियन महिला चॅम्पियन तानिया सचदेव, माजी विश्व ज्युनियर चॅम्पियन सौम्या स्वामीनाथन, राष्ट्रीय महिला विजेती मेरी अॅन गोम्स यांचा समावेश होता. या तिन्ही भारतीय खेळाडूंना मागे टाकत गोव्याच्या भक्तीने बाजी मारली.मानांकनात आपल्याहून वरचढ असलेल्या खेळाडूंना मागे टाकत विजेतेपदाचा मान पटकावणे खूप अभिमानस्पद असल्याची भावना तिने व्यक्त केली.
फ्रान्सला रवाना....
बुद्धिबळ स्पर्धेत सातत्यपूर्ण यश मिळवणाऱ्या भक्ती आणि कॅँडीटेड मास्टर नितिश बेलूरकर यांना फ्रान्समधील वॉवजानी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. स्कॉटलॅँड येथूनच हे दोन्ही खेळाडू फ्रान्ससाठी रवाना झाले.
बुद्धिबळावरील ‘भक्ती’चे यश...
खेळावरील तिची प्रचंड मेहनत, श्रद्धा आणि रघुनंदन गोखले सरांचे मार्गदर्शन यामुळे तिच्या यशाची वाटचाल सुरू आहे. तिच्या आजच्या कामगिरीने आम्ही खूप आनंदी आहोत. तिच्या यशाबद्दल विश्वास होताच. तिने सुवर्णपदक मिळवल्याची बातमी ऐकताच आम्ही तर भारावलोच. (भक्तीचे आई-वडील)