कणकुंबी ग्रामस्थांचा घेराव

By Admin | Updated: May 23, 2014 01:27 IST2014-05-23T01:26:42+5:302014-05-23T01:27:17+5:30

कणकुंबी ग्रामस्थांचा घेराव

The girth of the granite villagers | कणकुंबी ग्रामस्थांचा घेराव

कणकुंबी ग्रामस्थांचा घेराव

डिचोली : कर्नाटक निरावरी निगमचे व्यवस्थापकीय संचालक आर. रुद्रय्या गुरुवारी आकस्मिकपणे कणकुंबी येथे आले असता ग्रामस्थांनी व माउली मंदिर प्रतिष्ठानच्या सदस्यांनी त्यांना घेराव घालून आमच्या श्रद्धेचे प्रतीक असलेल्या माउली मंदिराची स्थिती दयनीय केल्याबद्दल व ती सुरक्षित करण्यासाठी हट्ट धरला. लोकांचा आक्रमकपणा पाहून मंदिराच्या संवर्धनासाठी व आवश्यक कामकाजाची पूर्तता करण्यासाठी त्वरित काम हाती घेण्याबाबत संबंधित कंत्राटदारास आदेश दिल्याने या ठिकाणी सभामंडपाच्या कामाला चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सीमा चळवळीतील तरुण कार्यकर्ते किरण गावडे यांनी कर्नाटक निरावरी निगमचे व्यवस्थापकीय संचालक आर. रुद्रय्या यांची भेट घेऊन त्यांना माउली मंदिराच्या सध्याच्या स्थितीस पूर्णपणे कर्नाटक निरावरी निगम कारणीभूत असून आमच्या श्रद्धास्थानाला धक्का लावणार्‍याची गय करणार नसल्याचे बजावून सांगितले. त्यांनी माउली मंदिर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. बबन दळवी यांच्याशी संपर्क साधून त्यांना त्वरित घटनास्थळी बोलावून घेतले. लोकांचा पवित्रा बघून अधिकारी रुद्रय्या यांनी मंदिराच्या उभारणीसाठी सर्व ती खबरदारी घेतानाच मंदिराच्या अस्तित्वाला कसलाच धोका निर्माण होऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले. कणकुंबीचे सरपंच दीपक वाडेकर यांनी आम्हाला कळसा कालव्यामुळे खूपच त्रास होत असून ध्वनी, हवा, पाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो. मंदिरासारख्या पवित्र वास्तूकडे बेजबाबदारपणे काम करून सभामंडपाला तडे जाण्याची घटना निंदनीय असून वारंवार उपाय करण्याच्या घोषणा देऊन काहीच न केल्याने हा पवित्रा घेणे भाग पडल्याचे सांगितले. या संदर्भात निरावरी निगमचे व्यवस्थापकीय संचालक आर. रुद्रय्या यांच्याशी या प्रतिनिधीने संपर्क साधला असता माउली सदस्यांशी चर्चा केल्याचे सांगून मंदिराच्या रक्षणासाठी सर्व प्रकारची तयारी व खबरदारी घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. कंत्राटदार अरुण कुमार यांनी निगमच्या आदेशानुसार मंदिराचे हित जपण्याला प्राधान्य देत मंदिराची डागडुजी करण्याचे काम हाती घेण्यात येणार असून मंदिराला धोका निर्माण होईल, असे कोणतेच काम करणार नसल्याचे स्पष्ट केले. या वेळी राजाराम गावकर, अरुण गावडे, हनुमंत गावडे, अरुण नाईक आदी बैठकीस उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The girth of the granite villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.