बारावीत मुलींचीच बाजी
By Admin | Updated: May 12, 2014 01:24 IST2014-05-12T01:23:38+5:302014-05-12T01:24:45+5:30
बारावीत मुलींचीच बाजी

बारावीत मुलींचीच बाजी
पणजी : गोवा शालांत व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गेल्या मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ८५.५४ टक्के लागल्याचे रविवारी मंडळाने जाहीर केले. या परीक्षेत मुलांपेक्षा मुली जास्त संख्येने उत्तीर्ण झाल्या. राज्यातील ८५ पैकी एकूण दहा उच्च माध्यमिक विद्यालयांचे निकाल ९५ टक्क्यांपेक्षा जास्त लागले. शालांत मंडळाचे अध्यक्ष जे. आर. रिबेलो यांनी सचिव भगिरथ शेट्ये यांच्या उपस्थितीत रविवारी पर्र्वरीत पत्रकार परिषद घेतली आणि सविस्तर निकाल जाहीर केला. २०१२ साली बारावीच्या परीक्षेचा निकाल ८३.३६ टक्के लागला होता. २०१३ साली हे प्रमाण ८२.९६ टक्के झाले. यंदा एकूण निकाल ८५.५४ टक्के लागला. परीक्षेला बसणार्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींपेक्षा मुलांची संख्या जास्त होती; पण मुली जास्त संख्येने उत्तीर्ण झाल्या. एकूण ११ हजार ७२० विद्यार्थी परीक्षेस बसले होते व त्यापैकी १० हजार २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्यांमध्ये ८८.५५ टक्के मुली आणि ८२.५५ टक्के मुलांचा समावेश आहे. सर्व पद्धती अधिक सुटसुटीत करण्यात आल्याने यंदा बारावीच्या परीक्षेचा निकाल जास्त लागला, असे शालांत मंडळाचे अध्यक्ष रिबेलो म्हणाले. गेल्यावर्षी राज्यातील नऊ हायरसेकंडरींचा निकाल ९५ टक्क्यांपेक्षा जास्त लागला होता. यंदा अशा विद्यालयांची संख्या दहा झाली. झेवियर हायरसेकंडरी, पीपल्स हायरसेकंडरी, हरमल पंचक्रोशी, डॉन बॉस्को तसेच नव्याने सुरू झालेली धेंपे विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय, वास्कोतील सेंट अॅण्ड्र्यूज या सहा हायरसेकंडरींचे निकाल आता प्रथमच ९५ टक्क्यांपेक्षा जास्त लागले आहेत. बारावीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी फक्त १६७ विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांचा आधार घ्यावा लागला. एका किंवा दोन विषयांमध्ये जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत, त्यांना येत्या १७ जून रोजी पुरवणी परीक्षा देता येईल, असे रिबेलो यांनी सांगितले. विशेष मुलांसाठीच हायरसेकंडरी चालविणार्या सेंट झेवियरचा निकाल ७० टक्के लागला. सरकारी हायरसेकंडरींचा निकाल हा अनुदानित विद्यालयांच्या तुलनेत खूप जास्त प्रमाणात लागलेला नाही, असे रिबेलो यांनी पत्रकारांच्या एका प्रश्नादाखल सांगितले. गेल्या दहा वर्षांपासून शालांत मंडळ विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करत नाही. (खास प्रतिनिधी)