जीसीए प्रकरण न्यायालयात
By Admin | Updated: June 19, 2015 01:36 IST2015-06-19T01:36:08+5:302015-06-19T01:36:16+5:30
पणजी : डॉ. शेखर साळकर यांनी गोवा क्रिकेट असोसिएशनची निवडणूक जिंकण्यासाठी ६४ क्लबांचा मतदानाचा हक्क काढून घेण्याच्या अरेरावीच्या कृत्याविरुद्ध

जीसीए प्रकरण न्यायालयात
पणजी : डॉ. शेखर साळकर यांनी गोवा क्रिकेट असोसिएशनची निवडणूक जिंकण्यासाठी ६४ क्लबांचा मतदानाचा हक्क काढून घेण्याच्या अरेरावीच्या कृत्याविरुद्ध गावोगावच्या क्रिकेट संघांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून जलस्रोतमंत्री दयानंद मांद्रेकर यांनी साळकरांविरुद्ध उघड पावित्रा घेतला, तर ५० क्लबांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.
बुधवारी गोव्यातील बऱ्याच क्लबांच्या सदस्यांनी पर्वरी येथील जीसीएच्या कार्यालयात घुसून अध्यक्ष शेखर साळकर यांना घेराव घातला होता. सूत्रांनी सांगितले की, ८२ क्लबांनी आता साळकर यांच्या विरोधात कडक पावित्रा घेत त्यांनी बनावट सह्या करून ज्या अधिकृत सदस्यांना हटवून त्यांच्या जागी बनावट सदस्य आणले आहेत, त्यांच्या विरोधात गावागावांत निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. साळकर यांचे इस्पितळ व निवासस्थानीही ते निदर्शने करतील, असा इशारा देण्यात आला आहे.
जलस्रोतमंत्री दयानंद मांद्रेकर यांनी तर आज डॉ. शेखर साळकर यांच्या कार्यपद्धतीविरुद्ध जोरदार रोष व्यक्त केला. ते म्हणाले : मला पक्षीय भूमिका काय आहे याच्याशी सोयरसुतक नाही; परंतु जीसीएचा कारभार सुधारला पाहिजे. बनावट सदस्य नोंदवून त्यांच्याकडून मतदान करून घ्यायचा डाव कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होता कामा नये.
मांद्रेकर यांचा स्वत:चा शिवोली येथील क्लबही डॉ. शेखर साळकर यांच्या निर्णयामुळे मांद्रेकर यांच्या हातातून निसटला आहे. त्या क्लबचा मतदानाचा हक्क एका ‘लामाणी’ नावाच्या माणसाला मिळाला आहे. त्यामुळे मांद्रेकर संतप्त बनले आहेत. सदस्यांच्या मते, बऱ्याच क्लबांचे अध्यक्ष व सचिव यांच्या बनावट सह्या वापरून मतदानास डॉ. साळकर यांनी आपल्या मर्जीतील माणसे घुसविली आहेत.
दुसऱ्या बाजूला, किमान ५० क्लबांनी डॉ. साळकर यांच्या कार्यपद्धतीला व निवडणुकीतील गोंधळाला उच्च न्यायालयात आज आव्हान दिले. हा अर्ज सोमवारी सुनावणीस येईल. डॉ. साळकरांनी आपल्यालाच मतदान व्हावे यासाठी ठरावीक लोकांनाच मतदानाचा अधिकार दिला व बऱ्याच क्लबांची मान्यता रद्द केली, असा दावा त्यात करण्यात आला आहे.
(विशेष प्रतिनिधी)
जीसीएतील कलगीतुरा संपेना/२