कचरा प्रकल्पाला
By Admin | Updated: July 20, 2015 01:09 IST2015-07-20T01:09:44+5:302015-07-20T01:09:59+5:30
पणजी : येथील हिरा पेट्रोल पंपच्या मागील बाजूस नियोजित कचरा प्रकल्पाच्या नावाने मोठ्या प्रमाणात खारफुटींची कत्तल झाल्याचा तसेच सीआरझेडचे सर्व नियम

कचरा प्रकल्पाला
पणजी : येथील हिरा पेट्रोल पंपच्या मागील बाजूस नियोजित कचरा प्रकल्पाच्या नावाने मोठ्या प्रमाणात खारफुटींची कत्तल झाल्याचा तसेच सीआरझेडचे सर्व नियम धाब्यावर बसविल्याचा आरोप असूनही गोवा किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणाने नुकत्याच झालेल्या ११८व्या बैठकीत या प्रकल्पाला सशर्त परवानगी दिली. ३५५५ चौरस मीटर जागेत हा प्रकल्प होणार आहे. सुका कचरा वेगळा काढण्याचे काम तसेच जैविक कंपोस्टिंग केंद्र उभारले जाणार आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी खारफुटींची कत्तल झाल्याचे तसेच मातीचा भराव टाकल्याचे निरीक्षण प्राधिकरणाच्याच तांत्रिकी अधिकाऱ्याने याआधी नोंदवले होते. असे असतानाही प्रकल्पाला क्लीन चिट दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते.
या जागेत पूर्णपणे कुंपण घालावे तसेच कचऱ्याची घाण वाहून नदीत येऊ नये आणि खारफुटींचीही हानी होणार नाही याची दक्षता घेतली जावी, असे प्राधिकरणाने बजावले आहे. तसे हमीपत्र महापालिकेने द्यावे लागेल. महापालिकेसाठी मेसर्स शिल्पी कन्स्ट्रक्शन कंपनी काम करीत आहे. जागरूक नागरिकांनी हे प्रकरण राष्ट्रीय हरित लवादासमोर आणले असून २१ आॅगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
प्राधिकरणाचे सदस्य सचिव श्रीनेत कोटवाले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, या प्रकल्पासाठी २00८ मध्येच भू-रूपांतर सनद मिळालेली आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच नगर नियोजन खात्याचेही आवश्यक ते परवाने आहेत. मांडवी नदीवरील तिसऱ्या पुलाच्या बांधकामासाठी सीआरझेड, वन खाते तसेच जैवविविधता मंडळाने सुमारे ३५0 खारफुटी कापण्याची परवानगी दिलेली आहे. काही खारफुटी त्यातीलही असण्याची शक्यता आहे. या कचरा प्रकल्पासाठी अटी घालूनच परवानगी दिली आहे. महापालिकेने गेल्या २३ जून रोजी या प्रकल्पाबाबत सर्व्हे आराखडा प्राधिकरणाला सादर केलेला आहे. (प्रतिनिधी)
क्लीन चिटमुळे आश्चर्य!