गव्याला मोेलेत जीवदान
By Admin | Updated: May 17, 2017 02:40 IST2017-05-17T02:38:56+5:302017-05-17T02:40:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्कफोंडा : रानडुकराच्या शिकारीसाठी लावलेल्या फासात तब्बल तीन दिवस अडकून पडलेल्या गव्याला वन अधिकाऱ्यांच्या पथकाने अथक

गव्याला मोेलेत जीवदान
लोकमत न्यूज नेटवर्क
फोंडा : रानडुकराच्या शिकारीसाठी लावलेल्या फासात तब्बल तीन दिवस अडकून पडलेल्या गव्याला वन अधिकाऱ्यांच्या पथकाने अथक परिश्रम घेऊन सुखरूप सोडविले. ही घटना धाट फार्म-मोले येथे घडली. क्षेत्रीय वन अधिकारी प्रकाश सालेलकर व दामोदर सालेलकर यांच्यासह फॉरेस्ट गार्ड अर्जुन गावस, विश्वास मांद्रेकर व विश्वास नाईक हे ड्रायव्हर, माहूत आफ्रोज शेख यांनी हे प्रशंसनीय काम केले.
अज्ञातांनी रानडुकराच्या शिकारीसाठी धाट फार्म येथील संदीप व्यंकटेश आजरेकर यांच्या मालकीच्या वन क्षेत्रात फास लावला होता. दुर्दैवाने या फासात गवा सापडला. ही माहिती आजरेकर यांना कळल्यावर त्यांनी वन खात्याला कल्पना दिली. खात्यातर्फे गव्याला वाचविण्यासाठी म्हादई अभयारण्यात कामगिरी बजावणारे क्षेत्रीय वन अधिकारी प्रकाश सालेलकर यांना सोमवारी रात्री ९ वाजता फोनवरून माहिती देण्यात आली. प्रकाश सालेलकर यांनी बोंडला अभयारण्यातील क्षेत्रीय वन अधिकारी दामोदर सालेलकर यांना माहिती दिल्यानंतर तेथून वैद्यकीय साहित्यासह सर्वजण धाट फार्म येथे दाखल झाले. गवा फासात अडकलेला होता. त्याची परिस्थिती पाहिल्यास तो किमान तीन दिवस त्यामध्ये अडकलेला असावा. पाण्याविना तो ‘डिहायड्रेट’ झाला होता. त्यामुळे त्याला बेशुद्ध करून सोडविण्याची उपाययोजना धोक्याची होती. त्याच परिस्थितीत साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ‘आॅपरेशन रेस्क्यू’ सुरू करण्यात आले. त्यात पहाटे अडीज वाजता यश आले. गव्याला सुखरूप सोडविण्यात आले. सुटल्यानंतर हिंसक बनण्याचीही त्याची परिस्थिती नव्हती. उलट त्याला वन कर्मचाऱ्यांनी भरपूर पाणी पाजले. नंतर तो त्याच भागातील जंगलात निघून गेला, असे सालेलकर यांनी सांगितले. आणखी चार-पाच तास गवा त्याच परिस्थितीत राहिला असता, तर कदाचित त्याचा जीव धोक्यात आला असता, असे ते म्हणाले.