थर्ड फ्रंटसाठी मोर्चेबांधणी
By Admin | Updated: June 16, 2015 00:59 IST2015-06-16T00:54:59+5:302015-06-16T00:59:07+5:30
पणजी : भाजप व काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांकडून अपेक्षाभंग झाल्याची भावना गडद होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही राजकारणी थर्ड फ्रंट स्थापन

थर्ड फ्रंटसाठी मोर्चेबांधणी
पणजी : भाजप व काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांकडून अपेक्षाभंग झाल्याची भावना गडद होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही राजकारणी थर्ड फ्रंट स्थापन करण्यासाठी सक्रिय झाले आहेत. त्यात काही आमदारांचाही समावेश आहे. काँग्रेसचे कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे २०१७च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून नियोजित थर्ड फ्रंटमध्ये सहभागी होण्याच्यादृष्टीने तयारीत आहेत.
२०१७ सालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात थर्ड फ्रंट आकाराला येणार आहे. त्यादृष्टीने काही आमदारांमध्ये बोलणी सुरू झाली आहेत. भाजपचे आमदार मायकल लोबो हेही पक्षात खूप अस्वस्थ असून ते देखील थर्ड फ्रंटच्या गळाला लागू शकतात, अशी माहिती मिळाली. काँग्रेसचे कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांच्यावर नाराज आहेत. फालेरो हे चर्चिल आलेमाव यांना पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन विधानसभेचे तिकीट देण्याचा प्रयत्न करतील, अशी चर्चा आमदारांच्या एका गटात सुरू आहे. काँग्रेस पक्ष जर जुन्याच चेहऱ्यांना घेऊन २०१७ची निवडणूक लढवणार असेल, तर आपण काँग्रेस पक्ष सोडेन व थर्ड फ्रंटचा पर्याय स्वीकारीन, असे रेजिनाल्ड आपल्या कार्यकर्त्यांना सांगत आहेत.
रेजिनाल्ड व नियोजित थर्ड फ्रंडचे जनक आमदार विजय सरदेसाई यांच्यात घनिष्ठ मैत्री आहे. या प्रतिनिधीने रेजिनाल्ड यांना थर्ड फ्रंटविषयी सोमवारी विचारले असता, आपण अजून निर्णय घेतलेला नाही, एवढेच ते म्हणाले. मात्र, रेजिनाल्ड यांनी मानसिक तयारी आता चालविली असल्याची माहिती त्यांच्या नजीकच्या काही कार्यकर्त्यांकडून प्राप्त झाली. (खास प्रतिनिधी)