पैशांसाठी केलेले मित्राचेच अपहरण आणि खून
By Admin | Updated: June 23, 2014 01:37 IST2014-06-23T01:36:18+5:302014-06-23T01:37:24+5:30
आठ वर्षांनंतर मंदार सुर्लकर प्रकरण निवाड्याकडे : आज निकाल शक्य

पैशांसाठी केलेले मित्राचेच अपहरण आणि खून
सुशांत कुंकळयेकर - मडगाव - आठ वर्षांपूर्वी संपूर्ण गोव्याला हादरवून सोडणाऱ्या मंदार सुर्लकर खून प्रकरणाचा निवाडा सोमवार दि. २३ रोजी बाल न्यायालयाचे न्यायाधीश बी. पी. देशपांडे देण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा निवाडा काय होईल याची उत्सुकता आहे. दुर्दैवी सुर्लकर कुटुंबाला न्याय मिळेल का, हेही आजच्या निवाड्याने स्पष्ट होणार आहे.
१४ आॅगस्ट २00६ रोजी मंदारचे त्याच्याच मित्राने अपहरण केले होते. ५0 लाखांच्या खंडणीसाठी हे अपहरण केल्याचा पोलिसांचा दावा आहे. दुसऱ्या दिवशी केरी-फोंडा येथे मंदारचा मृतदेह सापडला होता.
या प्रकरणात मंदारचे मित्र असलेले रोहन धुंगट, रायन पिंटो, नफियाज शेख, शंकर तिवारी तसेच अल सलेहा बेग यांना अटक केली होती. यापैकी बेगला नंतर माफीचा साक्षीदार म्हणून घोषित केले होते तर इतर सर्व संशयित मागची आठ वर्षे तुरुंगात स्थानबध्द आहेत.
या प्रकरणात माफीचा साक्षीदार ही सवलत मिळालेला बेग याने दिलेली साक्ष शहारे आणणारी होती. मंदार सुर्लकर हा एक व्यावसायिक डीजे होता. मंदारचे वडील वास्कोतील बिल्डर होते. ज्यांनी मंदारचा खून केला, त्यांना पैशांची निकड होती. त्यामुळे मंदारच्या वडिलांकडून मोठे घबाड मिळेल यासाठीच हा प्लॅन रचला होता. हा प्लॅन पूर्णत्वास आल्यास प्रत्येक संशयिताला प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचा वायदा झाला होता.
माफीचा साक्षीदार बनलेल्या बेगच्या साक्षीप्रमाणे हा अपहरणाचा प्लॅन रोहनने रचला होता व त्यासाठी त्याने रायनची मदत घेतली होती. व्यवसायाने डीजे असलेल्या मंदारला त्याच्या मित्रांनी पणजीत एक मोठा कार्यक्रम करायचा आहे, यासाठी चर्चेसाठी बोलावले होते.
रोहनने रचलेल्या कटाप्रमाणे रायन मोटार गाडी घेऊन १४ आॅगस्ट २00६ रोजी वास्कोला निघाला होता. त्याच्याबरोबर बेगही होता. वास्कोहून मंदारचे अपहरण करून त्याला पणजीला आणायचे, नंतर त्याला रायनच्या उसकई येथील घरी न्यायचे, असा प्लॅन शिजला होता.
आपले ईप्सित साध्य झाल्यावर मंदारचा कायमचा काटा काढण्याची तयारी त्यांनी ठेवली होती. मंदारला बांधून ठेवण्यासाठी दोरी, तोंड बंद करण्यासाठी टेप, त्याला बेशुध्द करण्यासाठी दारूने भरलेली सिरिंज तसेच ठार करण्यासाठी बेसबॉलची बॅट अशी तयारी ठेवली होती.
बेग याच्या साक्षीप्रमाणे त्या दिवशी मंदारला वास्कोहून मिरामारला आणले. त्याला गाडीतच जखडले. त्याने आवाज करू नये यासाठी त्याचे तोंड टेपने बंद केले होते.
त्याच्या हालचाली मंदाव्यात यासाठी आरोपींनी बरोबर आणलेल्या सिरिंजमधून त्याला व्होडकाचा डोसही पाजला होता. मंदारच्याच मोबाईलवरून आरोपींनी त्याच्या वडिलांना फोन करून ५0 लाखांची खंडणी मागितली होती. त्यांनी त्यांना घाबरलेल्या मंदारचा आवाजही ऐकविला होता आणि पोलिसांकडे न जाण्याची ताकीदही दिली होती.
बेग याच्या साक्षीप्रमाणे मंदारचे अपहरण केल्यानंतर त्याला कसे बांधून ठेवावे यासाठी संशयितांनी रंगीत तालीमही केली होती. यासाठी रायनने स्वत: आपल्याला सोफ्याला बांधून घेतले होते.
मंदारच्या वडिलांकडून खंडणी मिळणार नाही याची खात्री झाल्यावर तसेच मंदारकडून नावे सांगितली जाणार या भीतीने रायननेच बेसबॉलच्या बॅटने मंदारच्या डोक्यावर वार केला, असे बेगने साक्षीत सांगितले होते.
अपहरण झाल्यानंतर वास्कोचे तत्कालीन पोलीस निरीक्षक व सध्याचे पोलीस उपअधीक्षक महेश गावकर यांनी रोहनला ताब्यात घेतल्यावर प्रारंभी पोलिसांची दिशाभूल केली. नंतर या अपहरणाची कबुली दिली; मात्र तोपर्यंत त्याच्या मित्रांनी मंदारचा काटा काढला होता. त्यामुळे
जिवंत मंदारच्या ऐवजी त्याच्या कुटुंबीयांना मंदारचा मृतदेहच हाती लागला.