मोदींच्या हस्ते नव्या मांडवी पुलाची पायाभरणी
By Admin | Updated: June 11, 2014 01:19 IST2014-06-11T01:13:07+5:302014-06-11T01:19:10+5:30
पणजी : मांडवी नदीवर तिसरा पूल बांधण्याच्या कामाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या शनिवारी सायंकाळी पाच वाजता केली जाणार आहे,

मोदींच्या हस्ते नव्या मांडवी पुलाची पायाभरणी
पणजी : मांडवी नदीवर तिसरा पूल बांधण्याच्या कामाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या शनिवारी सायंकाळी पाच वाजता केली जाणार आहे, अशी माहिती मिळाली. पंतप्रधानांच्या सहभागाने शनिवारी दिवसभर चार वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत.
नौदलाच्या विमानासाठी वास्को येथे साकारलेल्या किनाराधिष्ठित चाचणी सुविधेचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी शनिवारी गोव्यात येत आहेत. त्यानिमित्ताने पणजीत त्यांचे अन्य कार्यक्रमही ठरले आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मोदी यांची दिल्लीत मंगळवारी भेट घेऊन चर्चा केली. दोनापावल येथील स्व. दिनदयाळ उपाध्याय स्टेडियममध्ये भाजपच्या सुमारे सात हजार कार्यकर्त्यांच्या सभेत मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी सातच्या सुमारास मिरामार येथील एका हॉटेलात राज्यभरातील सुमारे दीडशे बुद्धिवादी व्यक्तींशी पंतप्रधानांचा चर्चात्मक कार्यक्रम होणार आहे. तत्पूर्वी मांडवी नदीवर तिसरा पूल बांधण्याच्या कामाची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी केली जाणार आहे.
गोवा प्रदेश भाजपची मंगळवारी येथील मिनेझिस ब्रागांझा संस्था सभागृहात बैठक झाली व त्या बैठकीत मोदी यांचे सगळे कार्यक्रम यशस्वी करण्याचा निर्णय झाला. दिल्लीहून परतल्यानंतर मुख्यमंत्रीही त्या बैठकीस उपस्थित राहिले. (खास प्रतिनिधी)