धावजी-गवंडाळी ओव्हरब्रिजची ११ रोजी पायाभरणी; आमदार राजेश फळदेसाईंची माहिती
By समीर नाईक | Updated: March 10, 2024 15:53 IST2024-03-10T15:53:32+5:302024-03-10T15:53:56+5:30
मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्यानुसार ११ मार्च रोजी धावजी-गवंडाळी येथील रेल्वे ओव्हरब्रिजची पायाभरणी करण्यात येणार आहे.

धावजी-गवंडाळी ओव्हरब्रिजची ११ रोजी पायाभरणी; आमदार राजेश फळदेसाईंची माहिती
पणजी: कुंभारजुवे येथील अतीआवश्यक असणाऱ्या धावजी-गवंडाळी ओव्हरब्रिजची पायाभरणी ११ रोजी होणार असल्याची माहिती गोवा पुनर्वसन मंडळाचे अध्यक्ष व कुंभारजुवाचे आमदार राजेश फळदेसाई यांनी दिली.
जुने गोवा पंचायत सभागृहात कुंभारजुवा मतदारसंघासाठी आयोजित पंचायत चलो अभियान कार्यक्रमा दरम्यान आमदार राजेश फळदेसाई बोलत होते. यावेळी उपस्थित मत्स्यव्यवसाय मंत्री निळकंठ हळर्णकर यांनी जुने गोवा, गोलती-नावेली, साव मथायस आणि करमळी या पंचायतींमध्ये स्थानिकांनी उपस्थित केलेले प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.
मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्यानुसार ११ मार्च रोजी धावजी-गवंडाळी येथील रेल्वे ओव्हरब्रिजची पायाभरणी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सातत्याने विकासकामे केली जात आहेत. पुढील आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने दिलेल्या मुदतीत सर्व कामे पूर्ण होतील, असेही फळदेसाई यांनी सांगितले.
आतापर्यंत आमच्या मतदारसंघात अनेक विकासकामे झाली आहेत, आम्ही नुकतीच कृषी सेतूची स्थापना केली आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जुन्या गोव्यातील १७ कोटी रुपयांच्या सुशोभीकरणाच्या कामांचे अनावरण करण्यात आले. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या सेंट फ्रान्सिस झेवियर्सच्या प्रदर्शनापूर्वी हे काम पूर्ण होईल. कृषी महाविद्यालयाचे भूमिपूजनही लवकरच होणार आहे, असे फळदेसाई यांनी यावेळी सांगितले.
विकसित भारत २०४७'च्या व्हिजनमध्ये प्रत्येक व्यक्तीने सहभागी व्हावे
२०१४ मध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासून जनतेला, विशेषत: महिला, मुले आणि उपेक्षितांना सक्षम करण्यासाठी अनेक योजना जाहीर करण्यात आल्या. प्रत्येक पंचायतीमध्ये नागरिकांना मदत करण्यासाठी स्वयंपूर्णमित्र उपलब्ध आहेत. तुम्हाला मदत करण्याची जबाबदारी सरकारची आहे. 'विकसित भारत २०४७'च्या व्हिजनमध्ये प्रत्येक व्यक्तीने सहभागी व्हावे,' असे आवाहन मंत्री निळकंठ हळर्णकर यांनी केले.