सेझ जमिनीसाठी लवकरच फॉर्म्युला
By Admin | Updated: August 9, 2014 01:24 IST2014-08-09T01:23:45+5:302014-08-09T01:24:14+5:30
पणजी : सेझसाठी दिलेल्या जमिनी परत घेण्यासाठी सरकार सर्व पर्यायांचा वापर करेल आणि योग्य फॉर्म्युला काढणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री

सेझ जमिनीसाठी लवकरच फॉर्म्युला
पणजी : सेझसाठी दिलेल्या जमिनी परत घेण्यासाठी सरकार सर्व पर्यायांचा वापर करेल आणि योग्य फॉर्म्युला काढणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिले.
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला बोलताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी हे आश्वासन दिले. सेझसाठी देण्यात आलेली एकूण ३८ लाख चौरस मीटर जमीन अद्याप ताब्यात घेण्यात आलेली नाही. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात अडकून आहे. अशा परिस्थितीत या जमिनी मिळविण्यासाठी सरकारकडून काय पावले उचलली आहेत, असा प्रश्न आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी केला होता. या मुद्द्यावर मुख्यमंत्री योग्य तोडगा काढणार असल्याचे उद्योगमंत्री महादेव नाईक यांनी त्यांना सांगितले. त्यांच्या या उत्तरावर रेजिनाल्ड समाधानी झाले नाहीत. या प्रकरणात सरकारकडून कोणते ‘डील’ केले आहे याची माहिती सभागृहाला देण्यात यावी, असा प्रश्न त्यांनी केला; परंतु ते कोणत्या डीलची गोष्ट करीत आहेत याची माहिती अगोदर सदस्याने द्यावी, असा प्रतिहल्ला मंत्र्यांनी त्यांच्यावर चढविला.
आपण वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या आधारे बोलत असल्याचे रेजिनाल्ड यांनी सांगितले; परंतु वृत्तपत्रातील माहिती ही प्रमाण मानली जावू शकत नाही, असे सभापतींनी त्यांना सुनावले.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून सेझसाठी दिलेल्या जमिनी मिळविण्यासाठी सर्व पर्यायांचा उपयोग केला जाईल, असे सांगितले. मुद्दा सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे याविषयी सविस्तर माहिती आपण देऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.
सरकार आपला फॉर्म्युला तयार करण्यापूर्वी किंवा निर्णय घेण्यापूर्वी लोकांना विश्वासात घेईल काय, असा प्रश्न त्यांनी केला. यावर ज्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे त्यांनाच विश्वासात घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले. एवढे सांगून न थांबता त्यांना म्हणजे रेजिनाल्ड यांना विश्वासात घेण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले. तुमच्या सरकारकडून हा घोळ केलेला आहे याची आठवणही त्यांना करून दिली. योग्य फॉर्म्युला तयार करून नंतर त्यावर सूचना मागविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)