फोंडा, धारबांदोड्यात पडझड
By Admin | Updated: June 15, 2015 01:33 IST2015-06-15T01:32:51+5:302015-06-15T01:33:10+5:30
फोंडा : शनिवार रात्रीपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे फोंडा, तसेच धारबांदोडा तालुक्यात पडझडीच्या घटना घडल्या. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

फोंडा, धारबांदोड्यात पडझड
फोंडा : शनिवार रात्रीपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे फोंडा, तसेच धारबांदोडा तालुक्यात पडझडीच्या घटना घडल्या. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बोरी येथील नाल्यात पडलेल्या इसमाला फोंडा अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. तर आडपई येथे पडझडीमुळे घराचे २0 हजारांचे नुकसान झाले. तसेच झाडे व दगड कोसळण्याच्या घटनांमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक खोळंबली.
कोने-प्रियोळ येथील राष्ट्रीय महामार्गावर डोंगरावरील दोन मोठे दगड रस्त्यावर कोसळण्याची घटना घडली. संततधार अशीच सुरू राहिल्यास या भागात दरड कोसळण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली. येथील डोंगरकड्यांना काही भागात संरक्षक भिंत नसल्यामुळे असे प्रकार होत असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच सध्या गोव्याबाहेर असलेले वेलिंग-प्रियोळ-कुंकळयेचे सरपंच दामोदर नाईक यांनी बांधकाम खात्याला कळवून दगड रस्त्यावरून हटवले. रविवारी सकाळी पणसुले आणि धारबांदोडा या भागात राष्ट्रीय महामार्गावर झाडे कोसळल्यामुळे वाहतुकीत व्यत्यय आला. धारबांदोडा तालुक्यात अग्निशमन दलाचे कार्यालय नसल्यामुळे स्थानिकांनी फोंडा अग्निशमन दलाशी संपर्क साधला. नेमके त्याच वेळी शिरोड्यातही रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावरील झाड हटवून वाहतूक सुरळीत केली. मागाहून जवानांनीच झाडे हटवली. धारबांदोड्यात सर्व सरकारी कार्यालये पुरविण्यात आली आहेत. मात्र, अत्यावश्यक असलेले अग्निशमन दलाचे कार्यालय अद्याप उपलब्ध न केल्याने या भागात नाराजी व्यक्त होत आहे. निदान पावसाळ्यात तरी दलाचा एक बंब व काही जवान या भागात तैनात ठेवण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)