लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: सभापतिपदी भाजपचे सावर्डेचे आमदार गोवा विधानसभेच्या गणेश गावकर यांची काल, गुरुवारी निवड झाली. गावकर यांनी काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांचा ३२ विरुद्ध ७ मतांनी पराभव केला. निवडीनंतर त्यांनी आभार मानताना सभागृहाची शिस्त पाळण्याचा सल्ला सर्वांना दिला.
सभागृहात गोमंतकीयांचे प्रश्न मांडून ते सोडवणे ही विधिमंडळ सदस्य म्हणून सर्वाची जबाबदारी आहे. प्रत्येक आमदाराने नियमानुसार वागावे. सभागृहात दुसरा आमदार बोलताना त्याला व्यत्यय आणू नये. यासाठी कामकाज नियम पुस्तिकाही सर्वांना मी देणार असल्याचे गावकर यांनी सांगितले. रमेश तवडकर त्यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेले हे पद भरण्यासाठी विधानसभेचे खास अधिवेशन आज बोलविण्यात आले होते. भाजप व मित्र पक्षांतर्फे गणेश गावकर तर विरोधी गटातून काँग्रेस व मित्र पक्षांतर्फे एल्टन डिकॉस्टा यांनी उमेदवारी भरली होती. उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी सभागृहात मतदान घेतले असता गणेश गावकर यांच्या बाजूने ३२ जण उभे राहिले तर एल्टना पाठिंबा देण्यासाठी ७ विरोधी आमदार उभे राहिले. नंतर जोशुआ यांनी गावकर यांची सभापतिपदी निवड झाल्याचे जाहीर केले.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी गावकर यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, शिक्षण व क्रीडा क्षेत्रात नवीन सभापतींचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. चेन्नईमधील विद्यापीठाची डॉक्टरेट त्यांच्याकडे आहे. बजेट समितीचे ते अध्यक्ष होते. गावकर यांचा स्वभाव नेहमीच सहकार्याचा राहिलेला आहे. सभागृहात आम्ही केवळ ७विरोधक असलो तरी सभागृहाबाहेर मात्र ६३ टक्के जनतेने सरकारविरोधात मतदान केलेले आहे हे लक्षात ठेवून विरोधकांना प्रश्न मांडण्यासाठी सभापतींनी सभागृहात पुरेसा वेळ द्यायला हवा, असेही ते म्हणाले.
आमदार कार्ल्स फेरेरा म्हणाले की,' सभापतिपदावरील व्यक्ती तटस्थ असायला हवी. पक्ष विसरून काम करा. विरोधकांना सभागृहात त्यांचे हक्काचे तेवढेच द्या. सभापतीपदाची प्रतिष्ठा राखणे व नीतिमूल्ये जपणे गरजेचे आहे.
आमदार वीरेश बोरकर यांनी एसटी समाजाचा नेता सभापती झाल्याबद्दल अभिनंदन केले. रामा काणकोणकरांवरील हल्ल्याचा उल्लेख करून बोरकर म्हणाले की,' हे प्रकरण योग्यरित्या हाताळायला हवे. आम्ही विरोधक म्हणून लोकांवर जेव्हा अन्याय होईल, तेव्हा आवाज उठवू. ग्रामीण भागातील प्रश्न आम्ही उपस्थित करू.
मंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले की, गावकर माझे चांगले मित्र आहेत. जीव्हीएम हायर सेकंडरीत आम्ही सोबत शिकत होतो. ते गरिबीतून वर आलेले आहेत. तसेच कामगार संघटनेवरही त्यांनी काम केलेले आहे. गरिबांना त्यांचा नेहमीच आधार असतो. ते सभापती पदाचे पावित्र्य राखतील, असा मला पूर्ण विश्वास आहे.
मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही सभापतिपदी निवड झाल्याबद्दल गणेश गावकर यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, सरकार व भाजपच्यावतीने मी गावकर यांचे अभिनंदन करतो. सभापतिपदाला गावकर हे योग्य न्याय देतील व सभागृहाचे कामकाज चांगल्या पद्धतीने हाताळतील, असा विश्वास आहे.
एसटी समाजाचा गौरव : तवडकर
मंत्री रमेश तवडकर यांनी गावकर यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, गावकर यांच्या रूपाने एसटी समाजाच्या नेत्याला हे पद मिळाले याचा अभिमान आहे. ते अनेक वर्षे सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित आहेत. मी देखील अनेकवेळा त्यांचे मार्गदर्शन घेतले आहे. प्रशासनाचा त्यांना चांगला अनुभव आहे. एसटी समाज व गोमंतकीयांच्या भल्यासाठी ते काम करतील, असा मला पूर्ण विश्वास आहे.
रामा काणकोणकरवरील हल्लाप्रकरणी सभागृहात अर्ध्या तासाच्या विशेष चर्चेची मागणी
आम आदमी पक्षाचे आमदार वेंझी व्हिएगश यांनी राज्यात गुंडगिरी वाढली आहे, असा आरोप केला. सभापतींकडून अनेक अपेक्षा आहेत. एसटी समाजाला न्याय मिळाला पाहिजे. गोव्यातील शेतजमीन, डोंगर यांचे भूरूपांतर घाऊक स्वरूपात सुरू आहे. कायदा व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. गुंडगिरीच्या विषयावर अर्धा तास विशेष चर्चा घडवून आणावी. आमदार कुझ सिल्वा यांनीही काणकोणकर हल्ला प्रकरणी अर्ध्या तासाची चर्चा सभागृहात घडवून आणण्याची मागणी केली.
विरोधी आमदारांचे ऐकून घ्या : सरदेसाई
आमदार विजय सरदेसाई यांनीही गावकर यांना शुभेच्छा देताना काणकोणकर यांच्यावरील हल्ल्याचा विषय उपस्थित केला. आदिवासी समाजातील वन निवासींना त्यांचे जमिनींचे हक्क मिळायला हवेत. आदिवासी उपयोजना निधीचा पुरेपूर वापर व्हायला हवा. विधानसभेत २०२७ च्या निवडणुकीत तरी एसटींना राजकीय आरक्षण मिळाला हवे. ते मिळेल की नाही, हे सभापतींनी स्पष्ट करावे. तसेच विरोधी आमदारांचे ऐकून घेण्याची मानसिकता ठेवावी व सभापती म्हणून निपक्षपाती कार्य करावे.
Web Summary : Ganesh Gawkar elected Goa Assembly Speaker, defeating Elton D'Costa. He urged members to maintain discipline and address people's issues responsibly. Opposition leaders emphasized impartiality and allocating time for dissenting voices, while others highlighted Gawkar's background and commitment to social justice.
Web Summary : गणेश गावकर गोवा विधानसभा के अध्यक्ष चुने गए, एल्टन डी'कोस्टा को हराया। उन्होंने सदस्यों से अनुशासन बनाए रखने और लोगों के मुद्दों को जिम्मेदारी से संबोधित करने का आग्रह किया। विपक्षी नेताओं ने निष्पक्षता और असहमतिपूर्ण आवाजों के लिए समय आवंटित करने पर जोर दिया।