तुरुंग अधीक्षकांसह पाचजण निलंबित
By Admin | Updated: October 14, 2015 01:26 IST2015-10-14T01:26:28+5:302015-10-14T01:26:42+5:30
म्हापसा/पणजी : कोलवाळ तुरुंगात सोमवार, दि. १२ रोजी कैद्यांना झालेल्या मारहाणप्रकरणी तुरुंगाचे अधीक्षक मेल्विन वाझ यांच्यासह चार तुरुंग रक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.

तुरुंग अधीक्षकांसह पाचजण निलंबित
म्हापसा/पणजी : कोलवाळ तुरुंगात सोमवार, दि. १२ रोजी कैद्यांना झालेल्या मारहाणप्रकरणी तुरुंगाचे अधीक्षक मेल्विन वाझ यांच्यासह चार तुरुंग रक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. वाझ यांच्याच सांगण्यावरून कैद्यांना मारहाण झाल्याचे निष्पन्न झाल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी ‘लोकमत’ला रात्री सांगितले. वाझ यांची आधी बदली करण्यात आल्याचा आदेश काढला होता. मात्र, बुधवारी सकाळी त्यांच्या निलंबनाचा आदेश निघेल. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आयएएस अधिकारी सचिन शिंदे यांची
एक सदस्यीय समिती नेमल्याचे मुख्यमंत्री पार्सेकर यांनी सांगितले.
तुरुंग महानिरीक्षक एल्विस गोम्स यांनी मंगळवारी दि. १३ रोजी तुरुंगात जाऊन घटनेची चौकशी केली आणि तुरुंग रक्षकांकडून चूक झाल्याचे प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाल्याने ही निलंबनाची कारवाई करण्यात आली. या प्रकरणी आणखी काही जणांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता गोम्स यांनी व्यक्त केली आहे.
लक्ष्मण पाडलोसकर, केशव गावस, राकेश भानस्कर, विलास नाईक अशी निलंबित केलेल्या तुरुंग रक्षकांची
नावे आहेत.
काही कैद्यांनी मारहाण झाल्याबाबत म्हापशातील अमली पदार्थविषयक प्रकरणे हाताळणाऱ्या विशेष न्यायालयाच्या (एनडीपीएस) न्यायाधीशांकडे तक्रार केल्याने हे प्रकरण उजेडात आले होते. काही कैद्यांनी कारागृहात जाण्यास नकार दिल्याने सुरक्षा रक्षकांकडून मारहाण करण्याचा प्रकार घडला होता. याबाबत कैद्यांची वैद्यकीय तपासणी केली असता, त्यांना जबर मारहाण झाल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणी कारागृहातील सहा कैद्यांनी म्हापसा पोलीस स्थानकात तक्रार केली आहे. दरम्यान, सुमारे ५० कैद्यांनी संबंधित सुरक्षा रक्षकांवर कारवाईची मागणी करीत मंगळवारी जेवण घेण्यास नकार देऊन उपोषण सुरू केले होते.
दरम्यान, मानव अधिकार आयोगाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी कारागृहाला भेट दिली. या वेळी तेथे असलेल्या कैद्यांचा
जबाब नोंद करून घेतला. उपलब्ध माहितीप्रमाणे इटलीच्या कैद्याच्या हाताला व नायजेरियनच्या पायाला दुखापत झाली
आहे. कारागृहातील काही कैद्यांचे वकील पोवळेकर यांनीही मंगळवारी कारागृहाला
भेट दिली. कारागृहाचे महानिरीक्षक
एल्विस गोम्स यांनी कारागृहाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
दरम्यान, सार्वजनिक गाऱ्हाणी खात्याच्या संचालिका मार्गारेट फर्नांडिस यांना कोलवाळ कारागृह अधीक्षकपदी
नेमले आहे. (खास प्रतिनिधी)