गोव्यात मासेमारीच्याबाबतीत अतिक्रमणावरुन वाद वाढू लागले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 01:34 PM2018-10-17T13:34:14+5:302018-10-17T13:47:38+5:30

गोव्यात मासेमारीच्याबाबतीत अंतर्गत हद्दीवरुन आता वाद सुरु झाले आहेत.

FISHING TRAWLERS IN GOA | गोव्यात मासेमारीच्याबाबतीत अतिक्रमणावरुन वाद वाढू लागले

गोव्यात मासेमारीच्याबाबतीत अतिक्रमणावरुन वाद वाढू लागले

Next

पणजी - गोव्यात मासेमारीच्याबाबतीत अंतर्गत हद्दीवरुन आता वाद सुरु झाले आहेत. शिरदोण येथे जुवारी नदीत वास्कोच्या यांत्रिकी बोटी अतिक्रमण करुन पर्सिननेट जाळ्यांनी मच्छिमारी करीत असल्याने तेथील 150 पारंपरिक मच्छिमारांनी गेल्या आठवड्यात खात्याच्या मुख्यालयावर धडक दिली. त्यानंतर सरकारला या प्रश्नावर जाग आली.  कर्नाटक, महाराष्ट्र तसेच केरळपर्यंतचे ट्रॉलर्स समुद्रात गोव्याच्या हद्दीत येऊन मासेमारी करतात अशा तक्रारी मच्छिमारांकडून येत असतात त्यामुळे आता अंतर्गत वाद उफाळू लागला आहे. 

वास्को येथील यांत्रिकी बोटी शिरदोण, नावशीपर्यंत येतात आणि बेकायदा मच्छिमारी करतात. पर्सिननेट जाळी किनाऱ्यावर वापरण्यास मनाई असतानाही ही जाळी वापरुन मासेमारी करतात अशा स्थानिकांच्या तक्रारी आहेत. नदीत किंवा समुद्रात किनाऱ्यापासून पाच किलोमीटर अंतराबाहेरच या जाळ्यांचा वापर करता येतो. परंतु या सर्व नियमांचे उल्लंघन करुन शिरदोण येथे जुवारी नदीत मासेमारी केली जाते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. 

चर्च संस्थेनेही या अतिक्रमणाची गंभीर दखल घेतली आहे. फादर वालेरियन वाझ यांच्या मते, अशा पध्दतीने अगदी किनाऱ्यावर स्वैर मासेमारी झाल्यास भविष्यात मासळीच नष्ट होईल. दोनापॉल ते आगशी या पट्टयात सुमारे १ हजार पारंपरिक मच्छिमार आहेत. शिरदोणमधील मच्छिमारांनी याआधी अशा बोटी पकडून समज देऊन सोडलेल्या आहेत. परंतु अतिक्रमण आता शिगेला पोचले आहे. 

मच्छिमारी खात्याचे मंत्री विनोद पालयेंकर यांनी पुन: एकदा वास्कोतील मच्छिमारांना बोलावून समज द्यावी, अशी मागणी शिरदोण येथील मच्छिमारांनी केली आहे. २0१४ साली असाच प्रकार घडल होता. तेव्हा खात्याने ७ बोटी जप्त केल्या होत्या. आता पुन: असे प्रकार घडू लागले आहेत. सांत आंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी या अतिक्रमणाबद्दल संताप व्यक्त केला असून सरकारने आश्वासन देऊनही कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे म्हटले आहे.
 

Web Title: FISHING TRAWLERS IN GOA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.