सहकारातून राज्यात उभारले पहिले इस्पितळ: मुख्यमंत्री; सहा महिन्यांत सेवा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2024 12:51 IST2024-12-03T12:49:45+5:302024-12-03T12:51:07+5:30
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने हे इस्पितळ उभारण्यासाठी साडेदहा कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.

सहकारातून राज्यात उभारले पहिले इस्पितळ: मुख्यमंत्री; सहा महिन्यांत सेवा सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : सहकार क्षेत्रातून आरोग्य क्षेत्रात पाऊल टाकत एक इंटिग्रेटेड आयुर्वेदिक व अॅलोपथिक इस्पितळ साकारणे ही मोठी कामगिरी आहे. पं. दीनदयाळ मल्टिपर्पज सहकारी संस्थेच्या दीनदयाळ जनसेवा प्रतिष्ठानचा हा राज्यातील पहिला प्रकल्प आहे. या इस्पितळात आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना मोफत सेवा दिली जाणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
डिचोलीतील पं. दीनदयाळ मल्टिपर्पज सहकारी संस्थेच्या दीनदयाळ जनसेवा प्रतिष्ठानतर्फे इंडियन ऑईल कॉर्पोरेशन यांच्या सहकार्याने डिचोली येथे सामाजिक जबाबदारी अंतर्गत उभारण्यात आलेल्या पन्नास खाटांच्या इंटिग्रेटेड आयुर्वेदिक व अॅलोपथिक इस्पितळाचा हस्तांतरण सोहळा पर्वरी येथे मंत्रालयात झाला, यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
त्यांच्यासमवेत आयओसीएलचे कार्यकारी संचालक मुकेश रंजन दास, कार्यकारी संचालक व राज्य प्रमुख सौमित्रा श्रीवास्तव, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, प्रेमेंद्र शेट, दीनदयाळ जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष वल्लभ साळकर, उपाध्यक्ष कांता पाटणेकर, नगराध्यक्ष कुंदन फळारी, नगराध्यक्षा सिद्धी प्रभू व इतर संचालक, अधिकारी उपस्थित होते.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने हे इस्पितळ उभारण्यासाठी साडेदहा कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचेही यासाठी विशेष सहकार्य लाभले.
आरोग्य सेवा गतिमान करणार
आयुर्वेदाच्या माध्यमातून धारगळ येथे आयुष इस्पितळामार्फत लोकांना सेवा मिळत आहे. परंतु या इस्पितळातून लोकांना आयुर्वेद व अॅलोपथिक प्रकारचे उपचार मिळणार आहेत. शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोचवणे हा हेतू आहे. त्यासाठी राज्यातील आरोग्य सेवा गतिमान करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.