येत्या महिन्यात दुबईहून येणार पहिले चार्टर विमान

By Admin | Updated: September 21, 2014 02:12 IST2014-09-21T02:10:12+5:302014-09-21T02:12:34+5:30

यंत्रणा सज्ज : नव्या पर्यटन मोसमाची जोरदार तयारी

First charter plane coming from Dubai in the coming month | येत्या महिन्यात दुबईहून येणार पहिले चार्टर विमान

येत्या महिन्यात दुबईहून येणार पहिले चार्टर विमान

पणजी : नव्या पर्यटन मोसमाची जोरदार तयारी पर्यटन खात्याने सुरू केली असून यंत्रणा सज्ज होऊ लागली आहे. या पर्यटन मोसमात एकूण १२०० चार्टर विमाने गोव्यात दाखल होणार असून पहिले चार्टर विमान येत्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दुबईहून येणार आहे. ही माहिती पर्यटन खात्याचे संचालक अमेय अभ्यंकर यांच्याकडून मिळाली.
गेल्या वर्षी नऊशे चार्टर विमाने आली होती, त्यापेक्षाही जास्त चार्टर विमाने या वेळी येतील. डिसेंबरमध्ये होणाऱ्या सेंट झेवियर शव दर्शन सोहळ्याचाही उपयोग आम्ही गोव्याच्या पर्यटनाची जाहिरात करण्याच्या दृष्टीने करून घेणार आहोत. नव्या पर्यटन मोसमावेळी शॅकसाठी सीसीटीव्ही सक्तीचे करण्यात आलेले असले तरी सीसीटीव्ही लावण्यासाठी शॅक व्यावसायिकांना आणखी थोडा वेळ दिला जाईल. सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अत्यावश्यक आहे. एकदा वेळ दिली गेल्यानंतर मग सवलत दिली जाणार नाही. आम्ही कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करू, असे अभ्यंकर यांनी स्पष्ट केले. शॅकमधील कॅमेरे चालतात की नाही, हे पोलीस तपासून पाहतील. शॅक धोरणात भविष्यातही गरजेनुसार बदल केले जातील, असे अभ्यंकर म्हणाले. किनारपट्टीवर व विशेषत: शॅकमध्ये वंशवादास थारा दिला जाणार नाही. ठरावीक देशांतील नागरिकांना शॅकमध्ये प्रवेश बंद करायचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे त्यांनी एका प्रश्नादाखल सांगितले.
पर्यटन क्षेत्रासाठी मास्टर प्लॅन तयार करण्याच्या कामास येत्या आठवड्यापासून आम्ही गती देणार आहोत. पर्यटन क्षेत्रात नव्या व अधिक साधनसुविधा निर्माण करणे, हे आमचे लक्ष्य आहेच. गोव्याचा पर्यटन व्यवसाय कुठच्या दिशेने न्यावा व पर्यटन क्षेत्राची गरज कोणकोणती आहे या दृष्टीनेही मास्टर प्लॅन दिशा दिग्दर्शन करणार आहे. काही महिन्यांत प्लॅन तयार होईल. पर्यटनाशी निगडित विविध घटकांच्या बैठका घेऊन त्यांच्या सूचना आम्ही मास्टर प्लॅनसाठी घेणार आहोत. पर्यटक सेवा केंद्र सुरू करण्याचाही आमचा प्रयत्न आहे, असे अभ्यंकर यांनी सांगितले. हॉटेल नोंदणी किंवा पर्यटन क्षेत्रातील अन्य आस्थापनांची नोंदणी व नूतनीकरण हे आॅनलाईन केले जाईल. कार्यालयात खेपा न मारता आॅनलाईन पद्धतीने सर्व कामे व्हावीत, असा प्रयत्न आहे. त्यामुळे कामात व प्रक्रियेत पारदर्शकता येईल. सेवा इलेक्ट्रॉनिक करण्याचा विचार आहे. (खास प्रतिनिधी)

Web Title: First charter plane coming from Dubai in the coming month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.