मडगाव : दक्षिण गोव्यातील नेसाय येथील टेक फोर्स कम्पोझिट प्रा.ली कंपनीला आज गुरुवारी भीषण आग लागून अंदाजे दोन कोटींची मालमत्ता जळून खाक झाली. सकाळी सव्वा नउच्या दरम्यान ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत प्राणहाणी झाली नाही. आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागली. राज्यातील मडगाव, वेर्णा, फोंडा व कुडचडे येथून बंब आणावे लागले. एकूण 22 बंबचा वापर करुन नंतर आग विझविण्यात अग्निशामक दलांच्या जवानांना यश आले.सुमारे 88 हजार लीटर पाणी तसेच दोनशे लीटर फोमचा आग विझविण्यासाठी वापरण्यात आल्याची माहिती मडगाव अग्निशामक दलाच्या कार्यालयातून देण्यात आली.
टेक फोर्स कम्पोंझिट कंपनीत ऑटोमोबाईलचे सुटे भाग तयार केले जात आहे. आज सकाळी साडेआठ वाजता कंपनीचे काम सुरु करण्यात आले होते. त्यावेळी कटींगचे काम चालू असताना, अचानक स्पार्क होउन आगीचा भडका उडाला. कामगारांनी आग विझविण्यासाठी वापरल्या जाणा:या उपकरणांचा वापर करुन आग विझविण्याचाही प्रयत्न केला, मात्र तो फोल ठरला. मागाहून यासंबधी मडगाव अग्निशामक दलाला त्वरीत कळविण्यात आल्यानंतर दलाचे अधिकारी गील सोझा यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
आगीत कच्चा मालही जळून खाक झाला. तसेच फायबर ग्लास व अन्य वस्तुं आगीत भस्मसात झाल्या. मायणा - कुडतरी पोलिसांनीही घटनास्थळी जाउन पहाणी केली. या आग प्रकरणी पुढील तपास चालू आहे.