लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : साकवाळ-वेर्णा येथील बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये काल, शनिवारी आणखी एका विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली. या कॅम्पसमधील वसतीगृहाच्या खोलीत काल २० वर्षीय कुशाग्र जैन या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला. शुक्रवारी रात्रीपासून कुशाग्रचे वडील त्याला फोन करत होते. मात्र, दुसऱ्या दिवशी त्यांना मुलाच्या मृत्यूची माहिती मिळाली.
पोलिस उपअधीक्षक गुरुदास कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास कुशाग्रचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. कुशाग्रचे वडील शुक्रवारी रात्रीपासून त्याला मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. शनिवारी सकाळी कुशाग्र त्याच्या खोलीतून बाहेर आला नसल्याचे काही विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी त्याच्या खोलीचा दरवाजा ठोठावण्यास सुरुवात केली. बराचवेळ कुशाग्र दरवाजा उघडत नसल्याने काही जणांनी जोर लावून खोलीचा दरवाजा उघडला असता खोलीतील पलंगावर कुशाग्र मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले.
या घटनेची माहिती वेर्णा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने धाव घेत घटनेचा पंचनामा केला. कुशाग्र इकॉनॉमिक्स अॅण्ड कम्प्युटर सायन्सच्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होता. पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली आहे. सध्या तरी या मृत्यू मागचे कारण स्पष्ट नसले तरी पोलिस तपास करत आहेत.
वेर्णा पोलिसांना घटनास्थळाची पाहणी करून चौकशीला सुरुवात केली आहे. तसेच फोरेंन्सिक पथकानेही घटनास्थळाला भेट दिली असून त्यांनी तपास कार्य केले. कुशाग्रचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच त्याचे वडील आणि कुटुंबातील अन्य सदस्य उत्तर प्रदेश येथून गोव्यात पोचल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक गुरुदास कदम यांच्याकडून मिळाली. कुशाग्र याचा मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठवून देण्यात आला आहे. अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
९ महिन्यांत चार मृत्यू, त्यातील तीन आत्महत्या
गेल्या ९ महिन्यांत बिट्स पिलानीमध्ये चार विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. पहिल्या तीन घटनेत तिन्ही विद्यार्थ्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक गुरुदास कदम यांनी दिली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये कॅम्पसमध्ये आत्महत्येची पहिली घटना घडली. त्यानंतर मार्च २०२५, मे २०२५ मध्ये आत्महत्येची घटना घडली.
अभ्यासक्रमाचा फेरविचार करा : युरी आलेमाव
अभ्यासाच्या दडपणामुळे गेल्या तीन वर्षात नऊ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुहे सरकारने अभ्यासक्रमांचा फेरविचार करून या गंभीर प्रश्नावर तोडगा काढावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे. बिट्स पिलानीमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. या संस्थेव्यतिरिक्त राज्यात आणखी पाच घटना घडल्या आहेत, ज्यात बोर्डाच्या परीक्षेचा ताण, कमी गुणांमुळे नैराश्य आल्याने विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आम्हाला विद्यार्थ्यांकडून अचूक कारणे शोधणे आवश्यक आहे, अभ्यासक्रम कठीण आहे का आणि त्याबाबत जाणून घेतले पाहिजे. सरकारने तातडीने कार्यवाही करावी, असेही आलेमाव म्हणाले.