फालेरो सक्षम नाहीत!
By Admin | Updated: October 10, 2014 01:38 IST2014-10-10T01:35:18+5:302014-10-10T01:38:26+5:30
पणजी : लुईझिन फालेरो यांनी अजून काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रेही स्वीकारलेली नसताना त्यांच्यावर काँग्रेसचे एक असंतुष्ट आमदार माविन गुदिन्हो यांनी जोरदार टीका केली आहे.

फालेरो सक्षम नाहीत!
पणजी : लुईझिन फालेरो यांनी अजून काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रेही स्वीकारलेली नसताना त्यांच्यावर काँग्रेसचे एक असंतुष्ट आमदार माविन गुदिन्हो यांनी जोरदार टीका केली आहे. फालेरो मुख्यमंत्रिपदी असताना सहा महिनेदेखील सरकार चालवू शकले नव्हते. त्यांच्याकडे सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे कौशल्य व क्षमताच नाही, अशा शब्दांत गुदिन्हो यांनी टीका केली आहे.
माजी मुख्यमंत्री फालेरो यांची सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. फालेरो येत्या मंगळवारी पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. आपण काँग्रेसपासून दूर गेलेल्या सर्वांना बरोबर आणण्याचे काम करीन व याच कामास आपण प्राधान्य देईन, असे विधान फालेरो यांनी बुधवारी केले होते. त्या पार्श्वभूमीवर बोलताना गुदिन्हो यांनी गुरुवारी फालेरो यांचा समाचार घेतला. गुदिन्हो यांचे मावळते प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस यांच्याशीही पटत नव्हते. जॉन यांच्यावरही त्यांनी यापूर्वी टीका केली होती.
फालेरो हे मुख्यमंत्रिपदी असताना त्यांच्याकडे तेवीस आमदारांचे संख्याबळ होते; पण त्यांच्याविरुद्ध बंड झाले होते व काँग्रेसचे सरकार सहा महिन्यांत कोसळले होते. त्याची आठवण गुदिन्हो यांनी करून देऊन सर्वांना सोबत घेऊन जाणे फालेरो यांना जमतच नाही, अशी टिप्पणी केली. फालेरो यांच्यावर टीका करणारे गुदिन्हो हे पहिले आमदार ठरले आहेत. गुदिन्हो यांचे भाजपशी सख्य असल्याने काँग्रेस पक्षाने गेल्या काही महिन्यांपासून त्यांना पक्षाच्या सर्व कार्यक्रमांपासून दूर ठेवले आहे.
दरम्यान, फालेरो हे मंगळवारी सकाळी ९ वाजता काँग्रेस हाउसमध्ये येऊन पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. काँग्रेसच्या यापूर्वीच्या उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा समित्या आता पुनरुज्जीवित केल्या जाणार आहेत, अशी माहिती मिळाली. (खास प्रतिनिधी)