गोव्याच्या सीमेवरील हाराकिरी उघड, कोरोना तपासणीविनाच अनेक चालक गोव्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 12:01 PM2020-05-14T12:01:15+5:302020-05-14T12:01:26+5:30

गुरुवारी पहाटे गोमेकॉतील चाचणीचा अहवाल आला. सातही जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे गोमेकॉच्या प्रयोगशाळेतील चाचणीत सिद्ध झाले.

exposed on Goa border Negligence, many drivers in Goa without corona inspection vrd | गोव्याच्या सीमेवरील हाराकिरी उघड, कोरोना तपासणीविनाच अनेक चालक गोव्यात

गोव्याच्या सीमेवरील हाराकिरी उघड, कोरोना तपासणीविनाच अनेक चालक गोव्यात

Next

पणजी : गोव्यात सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आणि राज्याच्या सीमेवरील हलगर्जीपणा उघड झाला. गोव्याच्या सीमेवर वाहन चालकांना तपासून आत पाठवले जाईल, असे सरकारने यापूर्वी अनेकदा जाहीर केले तरी, प्रत्यक्षात सीमेवर चालकांना तपासलेच जात नाही हे सिद्ध झाले. शोभेपुरते दोन कोरोना किऑस्क सीमेवर स्थापन केले गेले आहेत, पण तिथेही अजून चालकांची तपासणी सुरू झालेली नाही. जे सात कोरोना रुग्ण गोव्यात सापडले त्यापैकी दोघेजण वाहन चालक आहेत.

सीमेवरून मोठ्या संख्येने वाहने गोव्यात येत आहेत. सीमेवर कुणालाच सॅनिटाईजही केले जात नाही व कुणाचीच कोरोना चाचणीही केली जात नाही. त्यामुळे सात व्यक्ती गोव्यात आल्यानंतर गोव्यातील इस्पितळातील चाचणीवेळी त्या कोरोनाग्रस्त सापडल्या. सातपैकी एकटा चालक जो गुजरातहून आला, त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने व कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने तो स्वत: चाचणीसाठी आला. त्यामुळे त्याचा कोरोना स्पष्ट झाला. अन्य सहामध्येही एक चालक आहे. त्याला कोरोनाची लक्षणे दिसत नव्हती. पाच जणांच्या कुटुंबासोबत तो आला. त्याची वैद्यकीय चाचणी केली तेव्हा तो कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. फोंडय़ातील उपजिल्हा इस्पितळातील चाचणीनंतर गोमेकॉ इस्पितळातही चाचणी केली गेली. गुरुवारी पहाटे गोमेकॉतील चाचणीचा अहवाल आला. सातही जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे गोमेकॉच्या प्रयोगशाळेतील चाचणीत सिद्ध झाले.

लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील झाल्यापासून मोठ्या संख्येने लोक जिल्हाधिका-यांकडून परवानगी मिळवून गोव्यात परतू लागले आहेत. गोमंतकीय कुटुंबे गोव्यात येत आहेत. त्यांनी यावेच पण गोव्यातील लोकांच्या हिताच्यादृष्टीने वाहनातील प्रत्येक माणसाची कोरोना चाचणी सीमेवरच करायला हवी, असे मत व्यक्त होत आहे. सीमेवर प्रत्येकाची कोरोना चाचणी करायला गेल्यास वाहन चालकांची रांग लागेल हे खरे असले तरी चाचणी करण्याशिवाय पर्याय नाही. मग सरकारने केरी व पत्रदेवी या सीमांवर कोरोना किऑस्क तरी का स्थापन केले आहेत व मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती काय करते असा प्रश्न निर्माण होतो.

खनिजपट्टय़ात जास्त चालक
माल वाहतूक सुरू झाल्याने मोठय़ा संख्येने ट्रकांचे चालक ट्रक घेऊन गोव्यात येऊ लागले आहेत. ते गोव्यातील बाजारपेठांसह अन्य अनेक ठिकाणी फिरतात. खनिज वाहतूक सुरू झाल्यानंतरही मोठय़ा संख्येने ट्रक चालक गोव्यात आले. त्यांचीही कोरोना चाचणी झालेली नाही. काहीजण चोरटय़ा मार्गानी आले आहेत व सरकारला त्याचे काहीच सोयरसुतक नाही असे दिसते.

रुग्णांमध्ये महिला व दोन मुली
जे सात रुग्ण सापडले आहेत, त्यात एक महिला व दोन मुली आहेत. त्या शिवाय चार पुरुष आहेत व चार पुरुषांमध्ये दोघे वाहन चालक आहेत. त्यांना बुधवारी क्वारंटाईन केले गेले होते. गोव्यात त्यांचा कुणाशी संपर्क आला नव्हता असा दावा सरकारी यंत्रणोकडून केला जातो. पण त्या दाव्यात किती तथ्य आहे हे शोधण्याचीही गरज आहे. या सातहीजणांना मडगाव येथील कोविद इस्पितळात ठेवून त्यांच्यावर उपचार सुरू केले गेले आहे. 3 एप्रिलनंतर हे नवे रुग्ण बुधवारी सापडले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष फिलिप डिसोझा यांनी चिंता व्यक्त केली. गोवा सरकारने आता तरी शहाणे व्हावे. गोमंतकीयांच्या आरोग्याशी कुणी खेळू नये. प्रत्येक सीमेवर गोव्यात येणा-या व्यक्तीची कोरोना चाचणी व्हायला हवी. वाहन चालकांची सीमेवर जर तपासणी झाली नाही तर गोव्यात कोरोनाचा सामाजिक प्रसार होईल. गोव्याला धोका संभवतो हे सात रुग्ण सापडल्यानंतर स्पष्ट झाले, असे फिलिप म्हणाले. मी आरोग्य सचिवांशी बोललो आहे. गोव्यात येणा-या प्रत्येक वाहन चालकाची प्रथम कोरोना चाचणी करायला हवी व त्यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) तयार करा, अशी सूचना मी सचिवांना केली आहे.
- विश्वजित राणे, आरोग्यमंत्री

Web Title: exposed on Goa border Negligence, many drivers in Goa without corona inspection vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा