आज निर्यात
By Admin | Updated: October 19, 2015 02:28 IST2015-10-19T02:28:06+5:302015-10-19T02:28:17+5:30
पणजी : खाणबंदीच्या तब्बल तीन वर्षांच्या कालावधीनंतर पहिली खनिज निर्यात सोमवारी होणार आहे. सेसा कंपनीचे ८८ हजार टन खनिज चीनला निर्यात केले जाणार आहे.

आज निर्यात
पणजी : खाणबंदीच्या तब्बल तीन वर्षांच्या कालावधीनंतर पहिली खनिज निर्यात सोमवारी होणार आहे. सेसा कंपनीचे ८८ हजार टन खनिज चीनला निर्यात केले जाणार आहे. येथील लघू बंदरात मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर बावटा दाखवून निर्यातीला आरंभ करतील.
सेसा स्टरलाईट कंपनीने खनिज ई-लिलावात सातत्याने सहभाग दाखवून तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिजाला मंदी असतानाही चांगली बोली लावून खनिजाची उचल केली. अलीकडच्या अकराव्या ई-लिलावात तर कंपनीने कोडली येथील खाणींवरील खनिजाची सर्वाधिक खरेदी केली. एकूण ३ लाख ६५ हजार ९६0 टन खनिजाची उचल या खाणींवरून झाली. सोनूस येथील खाणींवरून ८५९0 टन, अडवण येथील खाणीवरून १७,0२0 टन उचल झाली.
३0 सप्टेंबर रोजी झालेल्या बाराव्या ई-लिलावात शिरगाव खाणीवरून ४५00 टन खनिज कंपनीने खरेदी केले आहे. आतापर्यंतच्या बारा खनिज ई-लिलावांत ७६ लाख ४३ हजार टन खनिज विक्री झालेली आहे. यापैकी सर्वाधिक खनिज सेसा स्टरलाईट कंपनीनेच खरेदी केलेले आहे. तुलनेत परप्रांतीय ट्रेडर्सनी बोली लावून खरेदी केलेल्या खनिजाचे प्रमाण कमी आहे. बगाडिया ब्रदर्स, सांथिप्रिया मिनरल्स, कलिंगा अलाइड इंडस्ट्रिज, जेएसडब्ल्यू स्टील आदी परप्रांतीय व्यावसायिकांनी बोली लावून खनिज उचलले आहे.
खनिजाचा तेरावा ई-लिलाव महिनाअखेर होणार असून या लिलावात १३ लाख टन खनिज विक्रीस काढले जाणार आहे. आतापर्यंतच्या एकूण बारा ई-लिलावांमधून सरकारला ८१६ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. पहिल्या चार ई-लिलावांमध्ये चांगला दर सरकारला मिळाला; परंतु नंतर अपेक्षेइतका दर मिळाला नाही. बाराव्या ई-लिलावात तर केवळ १२ कोटी ३३ लाख रुपये मिळाले. (प्रतिनिधी)