लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे: तांबोसे परिसरातील शेतकरी मागच्या सात दिवसांपासून ओंकार नावाच्या हत्तीच्या दहशतीत आहेत. तब्बल ४०० किलोमीटर अंतर पार करून आलेल्या या हत्तीने तांबोसे गावातील भातशेती, केळी, कवाथे आणि पोफळी या पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली आहे. लाखोंचा तोटा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता सरकारकडे थेट प्रश्न उपस्थित केला आहे की, "हत्ती चार दिवस प्रवास करून तांबोसेत पोहोचतो, पण मंत्री-आमदार २० मिनिटांत का येत नाहीत?" हत्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
हत्ती ज्या मळ्यात थांबलेला आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भातशेती व कवाथ्याची झाडे असल्याने त्याला मुबलक खुराक मिळतो. तो खातो, लोळतो, एका जागी बसतो तसेच तेरेखोल नदीतही स्नान करतो. अपघात घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न स्थानिक पंच दया गवंडी यांनी उपस्थित केला.
अन्यथा रस्त्यावर उतरणार
शेतकरी शैलेश सामंत यांच्या शेतात दोन लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, 'सरकारने त्वरित हत्तीचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू.', असा इशाराही देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी
वनखात्याची टीम ठाण मांडून असली तरी हत्ती दूरवर मनुष्य दिसताच पळ काढतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री, वनमंत्री यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे सांगितले जाते. मात्र सात दिवस उलटूनही हत्तीला गावातून हाकलले गेलेले नाही, याबद्दल शेतकऱ्यांची तीव्र नाराजी आहे.
मुख्यमंत्र्यांकडून भरपाईची घोषणा, 'मिशन फॉर लोकल'कडून स्वागत
पेडणे तालुक्यातील तोरसे, मोपा, तांबोसे आदी गावांतील शेतकऱ्यांचे ओंकार हत्तीच्या आगमनामुळे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना एका महिन्याच्या आत तातडीने भरपाई मिळावी, या मागणीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तशी घोषणा केली. त्यामुळे 'मिशन फॉर लोकल, पेडणे'चे संस्थापक राजन कोरगावकर यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. वनविभाग, कृषी विभाग, महसूल विभाग आणि पोलिस प्रशासनाने एकत्रितपणे समन्वय साधून हत्ती घालवण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी कोरगावकर यांनी केली आहे.