नागरिकत्वाच्या मुद्द्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना
By Admin | Updated: September 6, 2014 01:24 IST2014-09-06T01:23:38+5:302014-09-06T01:24:36+5:30
पणजी : नागरिकत्व मिळविण्यासाठी तसेच दीर्घकालीन व्हिसा मिळविण्यासाठी येणाऱ्या अर्जांवर देखरेख ठेवावी व या अर्जांवर लवकर प्रक्रिया करून ते जलदगतीने निकालात निघावेत

नागरिकत्वाच्या मुद्द्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना
पणजी : नागरिकत्व मिळविण्यासाठी तसेच दीर्घकालीन व्हिसा मिळविण्यासाठी येणाऱ्या अर्जांवर देखरेख ठेवावी व या अर्जांवर लवकर प्रक्रिया करून ते जलदगतीने निकालात निघावेत म्हणून केंद्रीय गृह मंत्रालयाने टास्क फोर्सची स्थापना केली आहे. यामुळे नागरिकत्वाच्या विषयाबाबत वादात सापडलेल्या गोमंतकीयांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
नागरिकत्वाच्या विषयाबाबतच्या प्रकरणांचा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आढावा घेतला. नागरिकत्व व दीर्घकालीन व्हिसासाठी येणारे अनेक अर्ज हे बराच काळ प्रलंबित राहतात, अशा तक्रारी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे आल्यानंतर सिंग यांनी या तक्रारींची दखल घेतली. विलंबामुळे, विशेषत: अल्पसंख्याकांमधील लोकांची गैरसोय होते. विविध राज्यांकडेही अर्ज प्रलंबित राहतात. तिथेही लक्ष देऊन राज्य सरकारच्या गृह खात्यांशी व विदेशी नोंदणी विभागाशी चर्चा करावी म्हणून टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. विदेश विभागाच्या संयुक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली हा टास्क फोर्स स्थापन झाला असून येत्या दोन आठवड्यांत या फोर्सचे काम सुरू होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
दरम्यान, गोव्यात दुहेरी नागरिकत्वाचा विषय ज्वलंत बनलेला आहे. पोर्तुगालमध्ये ज्या गोमंतकीयांनी आपल्या जन्माची नोंदणी केली आहे, त्या सर्वांचे भारतीय नागरिकत्व अडचणीत आले आहे. या समस्येवर उपाय निघण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारचा टास्क फोर्स स्थापण्याचा निर्णय हा गोव्याला मदतरूप ठरेल, अशी प्रतिक्रिया गोव्याच्या प्रशासनात व्यक्त होत आहे. (खास प्रतिनिधी)