शिंदेंच्या शिवसेनेची गोव्यात एंट्री; सदस्य मोहिम राबवणार, लोकसभेची तयारी
By पूजा प्रभूगावकर | Updated: April 11, 2023 18:03 IST2023-04-11T18:03:19+5:302023-04-11T18:03:49+5:30
शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची गोव्यात एंट्री: सुप्रशासन व सदस्यत्व मोहीम राबवणार: अडसुळ यांची माहिती

शिंदेंच्या शिवसेनेची गोव्यात एंट्री; सदस्य मोहिम राबवणार, लोकसभेची तयारी
पणजी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने गोव्यात एंट्री घेतलीआहे. पक्ष विस्ताराच्या दृष्टीने प्रशासन व सदस्यत्व मोहीम राबवली जाईल. गोव्यातील काही महत्वाचे राजकीय नेते शिवसेनेच्या संपर्कात असून ते पक्षात प्रवेश करतील असे पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसुळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शिवसेना गोव्यात ३० वर्षापासून आहे. मात्र राजकीय स्तरावर त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र आता शिवसेना गोव्यात पुन्हा एकदा नव्याने लॉंच केली जात आहे. आगामी लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने ही तयारी असून शिवसेना गोव्यातूनही ही लढवेल असे त्यांनी स्पष्ट केले.
अडसुळ म्हणाले, की महाराष्ट्र शिवसेनेत काही महिन्यांपूर्वी बंडखोरी झाली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदार व मंत्र्यांनी शिवसेनेतून फुटून वेगळा गट निर्माण केला आहे. सरकारमध्ये असूनही विकासकामे करण्यास येणारी अडचण हे फुटीचे कारण होते. मुख्यमंत्री शिंदे हे दिवसरात्र महाराष्ट्रासाठी झटत आहेत . २४ तासांपैकी १८ ते २० तास काम करतातात. रात्री उशीरा सुध्दा ते कार्यकर्त्यांना भेटतात. महाराष्ट्र त्यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने विकास करीत असल्याचे त्यांनी सांगितले.