मुख्यमंत्रिपदी अखेर पार्सेकर
By Admin | Updated: November 9, 2014 03:17 IST2014-11-09T03:13:56+5:302014-11-09T03:17:25+5:30
पर्रीकर यांचा राजीनामा : नऊ आमदारांना मंत्रिपदाची शपथ; आवेर्तान तूर्त बाहेर

मुख्यमंत्रिपदी अखेर पार्सेकर
पणजी : शनिवारी दुपारी अपेक्षेप्रमाणे मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि नवे मुख्यमंत्री म्हणून सायंकाळी लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शपथ घेतली. राजभवनवर झालेल्या सोहळ्यावेळी आणखी नऊ आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली गेली. यात अॅड. फ्रान्सिस डिसोझा यांचाही समावेश आहे. आवेर्तान फुर्तादो यांना तूर्त मंत्रिपद दिले गेलेले नाही.
पर्रीकर हे देशाचे संरक्षणमंत्री म्हणून रविवारी दिल्लीत होणाऱ्या सोहळ््यावेळी शपथ घेणार आहेत. भाजपच्या विधिमंडळ गटाची शनिवारी दुपारी तीन तास बैठक झाली व त्या बैठकीवेळी पार्सेकर यांची नेतेपदी निवड करण्यात आली. अॅड. फ्रान्सिस डिसोझा यांनी मुख्यमंत्रिपद मिळावे म्हणून केलेले बंड तिथेच शमले. काबो राजभवन येथे भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या आणि संघ नेत्यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला. पार्सेकर यांच्यासह फ्रान्सिस डिसोझा, म.गो. पक्षाचे सुदिन ढवळीकर व दीपक ढवळीकर, तसेच भाजपचे दयानंद मांद्रेकर, दिलीप परुळेकर, महादेव नाईक, रमेश तवडकर, मिलिंद नाईक, एलिना साल्ढाणा यांचा मंत्री म्हणून शपथविधी पार पडला. राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांनी या सर्वांना पद व गोपनियतेची शपथ दिली.
लवकरच विस्तार व खाते वाटप
शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री पार्सेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्रिमंडळात एकूण दोन जागा रिकाम्या आहेत. मंत्रिमंडळ विस्तारावेळी त्या भरल्या जातील. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे येत्या आठवड्यात दिल्लीहून गोव्यात परततील. त्या वेळी त्यांच्यासह आम्ही इतरजण चर्चा करून सर्व मंत्र्यांसाठी खाते वाटप करू. पर्रीकर यांच्याकडे जेवढी खाती होती, तेवढी खाती मी माझ्याजवळ ठेवणार नाही. गोव्यातील खाण व्यवसाय आणि अन्य प्रश्नांबाबत आम्ही टीम आॅफ मिनिस्टर्स मिळून एकत्र निर्णय घेऊ. मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच होईल, असे पार्सेकर यांनी सांगितले.
पार्सेकरांची मराठीतून शपथ
मुख्यमंत्री पार्सेकर यांनी मराठीतून शपथ घेतली. मराठीतून शपथ घेणारे अलीकडील पस्तीस वर्षांतील ते पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांच्यासह ढवळीकर बंधू, मांद्रेकर, परुळेकर, महादेव नाईक, तवडकर यांनीही मराठीतून शपथ घेतली. डिसोझा यांनी कोकणीतून, तर श्रीमती साल्ढाणा यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. राज्यात तीनवेळा भाजपचे सरकार अधिकारावर आले; पण पर्रीकर यांच्यानंतर दुसरे कुणीच मुख्यमंत्री झाले नव्हते. पार्सेकर हे दुसरे ठरले. (खास प्रतिनिधी)