गोमंतकीय चित्रपटांना प्रोत्साहनाचे ‘तीळगूळ’
By Admin | Updated: January 16, 2015 01:25 IST2015-01-16T01:21:57+5:302015-01-16T01:25:28+5:30
नियमावली अधिसूचित : मराठी, कोकणी चित्रपटांना अनेक पुरस्कार मिळणार

गोमंतकीय चित्रपटांना प्रोत्साहनाचे ‘तीळगूळ’
पणजी : मकरसंक्रांतीचा सण साजरा होत असतानाच आज, गुरुवारी राज्य सरकारने गोमंतकीय मराठी-कोकणीतील चित्रपट निर्मितीसाठी नवी नियमावली तथा योजना अधिसूचित करून प्रोत्साहनाचे तीळगूळच दिले आहेत. राजपत्रात गुरुवारी ही नियमावली प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे राज्यात तयार होणाऱ्या मराठी व कोकणी चित्रपटांना आता अनेक पुरस्कार प्राप्त होणार आहेत.
गोवा स्टेट फिल्म फेस्टिव्हल रेग्यूलेशन्स-२०१४ या नावाने ही योजना तयार केली गेली आहे. राजभाषेतून चांगले सिनेमा तयार व्हावेत, असा या योजनेमागील हेतू असल्याचे नियमावलीत नमूद करण्यात आले आहे. फिचर फिल्म व नॉन फिचर फिल्म या विभागांतून सिनेमांची निवड केली जाणार आहे. गोव्यात जन्मलेल्या किंवा पंधरा वर्षांचा रहिवासी दाखला असलेल्या गोमंतकीय व्यक्तीने काढलेला सिनेमा हा गोमंतकीय सिनेमा मानला जाईल. त्यात पंधरा टक्के गोमंतकीय कलाकार वगैरे असावेत, अशा अटीही लागू करण्यात आल्या आहेत. गोमंतकीय पटकथा लेखकांना, तांत्रिक कर्मचारी व अन्य कलाकारांना प्रोत्साहन देण्याचाही सरकारचा हेतू आहे, असे नियमावलीत नमूद करण्यात आले आहे.
स्पेशल ज्युरी पुरस्कारही दिला जाणार आहे. नॉन फिचर फिल्म विभागासाठीही काही पुरस्कार निश्चित करण्यात आले आहेत.
(खास प्रतिनिधी)