शेतकऱ्यांना बळ देऊ, राज्य १०० टक्के साक्षर करू!: मुख्यमंत्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2024 11:24 IST2024-12-08T11:24:15+5:302024-12-08T11:24:47+5:30

गावातील शेतकऱ्यांची संख्या फलकावर नमूद करण्याची सूचना

empower the farmers and make the state 100 percent literate said cm pramod sawant | शेतकऱ्यांना बळ देऊ, राज्य १०० टक्के साक्षर करू!: मुख्यमंत्री 

शेतकऱ्यांना बळ देऊ, राज्य १०० टक्के साक्षर करू!: मुख्यमंत्री 

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्यातील शेतकऱ्यांना व शेतीला प्रोत्साहन तसेच कृषिकार्डाची सुविधा देण्यासाठी शेतकऱ्यांची संख्या कळणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व पंचायतींनी आपापल्या भागांतील शेतकऱ्यांची संख्या नमूद करणारे फलक लावावेत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. यावेळी त्यांनी नव्या वर्षात राज्य १०० टक्के साक्षर करण्यात करण्याचे लक्ष्य असल्याचा मनोदयही व्यक्त केला.

शनिवारी 'स्वयंपूर्ण गोवा' विषयावरील वेबिनारला संबोधित करताना ते बोलत होते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, केंद्र सरकारच्या किसान क्रेडिट कार्ड, किसान सॉइल कार्ड आणि किसान विमा कार्ड अंतर्गत सर्व शेतकऱ्यांना कव्हर करण्याचे राज्याचे लक्ष्य आहे. केंद्र सरकारच्या योजनांची राज्यात १०० टक्के पूर्तता करण्यात मदत केल्याबद्दल सावंत यांनी स्वयंपूर्ण मित्रांचे (स्वयंपूर्ण गोवा योजनेतील अधिकारी) कौतुक केले.

दरम्यान, पुढील वर्षी १९ डिसेंबरपर्यंत साक्षरता दर १०० टक्के करण्याचे लक्ष्य आहे. सर्व पंचायतींना हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काम करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. आपल्या कार्यक्षेत्रात एकही व्यक्ती निरक्षर राहणार नाही, ही खबरदारी प्रत्येकाने घ्यावी, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले, केरळने १०० टक्के साक्षरता गाठल्याचा दावा केला आहे; परंतु प्रत्यक्षात तसे दिसत नाही. गोव्याने खऱ्या अर्थाने शंभर टक्के साक्षरतेसाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे ते म्हणाले. 

शेतकऱ्यांबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, किसान क्रेडिट कार्ड, किसान सॉइल कार्ड आणि किसान विमा कार्ड यांसारख्या केंद्र सरकारच्या उपक्रमांसाठी सर्व शेतकऱ्यांना शंभर टक्के कव्हरेज मिळायला हवे.

सन १९६१ मध्ये ४५० वर्षे जुन्या वसाहतवादातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर साक्षरता मोहीम ही सर्वच राज्यांत हाती घेण्यात आली. गोव्याला उशिरा स्वातंत्र्य मिळाले तरी गोवा यात मागे पडणार नाही, असे ते म्हणाले. २०११ च्या जनगणनेनुसार, गोव्याचा साक्षरता दर ८८.७० टक्के आहे.
 

Web Title: empower the farmers and make the state 100 percent literate said cm pramod sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.