प्रख्यात तियात्रिस्त अनिलकुमार यांचे निधन
By Admin | Updated: February 7, 2015 01:53 IST2015-02-07T01:52:13+5:302015-02-07T01:53:03+5:30
मडगाव : अनिलकुमार या नावाने तियात्र रंगमंचावर प्रसिद्ध असलेले राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त तियात्रिस्त अनिल चंद्रकांत शेट देऊलकर

प्रख्यात तियात्रिस्त अनिलकुमार यांचे निधन
मडगाव : अनिलकुमार या नावाने तियात्र रंगमंचावर प्रसिद्ध असलेले राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त तियात्रिस्त अनिल चंद्रकांत शेट देऊलकर (वय ६३) यांचे शुक्रवारी सकाळी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचार सुरू असताना निधन झाले.
अनिलकुमार हे मधुमेहाचे रुग्ण होते. आजार बळावल्याने त्यांना गोमेकॉत उपचारासाठी दाखल केले होते. तीन दिवसांपूर्वी या व्याधीमुळे त्यांचा पायही कापावा लागला होता. त्यांच्या मागे तियात्रिस्त पत्नी फातिमा व पुत्र कॅनेथ असा परिवार आहे. शनिवारी संध्याकाळी चार वाजता फातोर्डा येथील त्यांच्या निवासस्थापासून अंत्ययात्रा निघणार असून मडगावच्या हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या निधनावर गोवा तियात्र अकादमीने दु:ख व्यक्त केले असून तियात्रिस्त व अन्य संस्थांनी शोकसंदेश प्रसिद्ध केले आहेत. अभिनय, दिग्दर्शन आणि गीत या तियात्राच्या तिन्ही क्षेत्रात त्यांचा हातखंडा होता. मूळ चांदर येथील अनिलकुमार लहान असतानाच गावातील मराठी नाटकात भूमिका करायचे. त्यानंतर ते त्यांच्या काकांबरोबर मुंबईला गेले आणि मुंबईतही मराठी नाटकात बालकलाकाराच्या भूमिका करू लागले. मात्र, त्यांना तियात्राकडे आणण्याचे श्रेय चांदरचे ट्रम्पेटवादक फिदेलिस फर्नांडिस यांना जाते. ते तियात्र विभागाकडे ओढले गेले आणि तेथे त्यांच्या ओळखी वाढल्यावर त्यांनी तियात्रांत कामही करण्यास सुरुवात केली.
आंतोन मोरायस यांच्या ‘जोल्माची खोपटी’ या तियात्रातून त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली. पेट्रिक दोरादो यांचा ‘तीन थेंबे’ हा त्यांचा तियात्रही गाजला. त्या वेळी लिगोरियो फर्नांडिस, एम.बॉयर, रुझारियो रॉड्रिगीस, बऱ्याच दिग्गज दिग्दर्शकांच्या हाताखाली काम केले. प्रेमकुमार यांच्या अर्धी भाकरी या तियात्रातील त्यांची भूमिका गाजली आणि त्यांनी व्यावसायिक तियात्रातही आपले पाय रोवले. तियात्र अकादमीचे अध्यक्ष प्रिन्स जाकोब यांनी अनिलकुमार यांच्या अभिनयाबद्दल बोलताना सांगितले, अनिलकुमार हे अष्टपैलू कलाकार होते. आपली भूमिका पूर्णपणे समजून घेऊनच ते ती साकारत. त्यामुळे त्यांच्या भूमिका लोकांना आवडत असत. तियात्राचे पक्के जाणकार असलेल्या अनिलकुमार यांनी दिग्दर्शक जुवांव आगुस्तीन फर्नांडिस यांच्या ‘तांदळाचे केस्ताव’, एम. बायर यांच्या ‘संवसार सुधोरलो’, ‘एकूच रस्तो’ यासारखे तियात्र पुन्हा रंगमंचावर आणून लोकांची मने जिंकली.
तियात्राबरोबर त्यांनी कोकणी चित्रपटातही काम केले. एम. दास यांच्या ‘गिरेस्ताकाय’ या सिनेमातील त्यांची भूमिका गाजली होती. ते उत्कृष्ट गीतकार होते. आर्नोल डिकॉस्ता यांच्या ‘कांट्यातले फूल’ या चित्रपटातील सगळी गीते त्यांनी लिहिली होती.
मुंबई व गोवा या दोन्ही ठिकाणचे रंगमंच गाजविणाऱ्या अनिलकुमार राज्य सांस्कृतिक पुरस्काराबरोबर अनेक पुरस्कार प्राप्त झाले. त्यात मुरली देवरा पुरस्कार, तियात्र अकादमीचा जीवन गौरव पुरस्कार आदींचा समावेश आहे. आमदार विजय सरदेसाई, तसेच आमदार विष्णू वाघ यांनी अनिलकुमार यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)