लोकमत न्यूज नेटवर्क, मोपा : सोमवारी सकाळी ओंकार हत्तीला महाराष्ट्राच्या हद्दीत पाठवून राज्यातील वनाधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, हा आनंद अल्पकाळ टिकला. हत्तीने पुन्हा सर्वांना चकवा देत कडशी, मोपा परिसरातच आपला मुक्काम कायम ठेवला. हत्ती तोरसेनजीक आल्याने पोलिसांच्या मदतीने काही काळ रस्ता वाहतुकीस बंद केला.
हत्ती आपल्या हद्दीत नको, यासाठी सिंधुदुर्ग वनविभाग आणि राज्याच्या वन विभागातील अधिकाऱ्यांनी आपला आटापिटा चालवला आहे. सोमवारी महाराष्ट्र हद्दीतील नेतर्डे फकीरफाटामार्गे हत्ती झोळंबेत पोहोचला. महाराष्ट्रातील वन अधिकाऱ्यांनी चांदेल हाळी, फकीरफाटा हद्दीवर तळ ठोकला होता. त्यांना गुंगारा देत राज्यातील वन अधिकाऱ्यांनी हत्ती सिंधुदुर्ग हद्दीत सोडला होता. मात्र, रात्री हत्ती डोंगरपाल, डिंगणे भागात दिसला.
पोलिसांची सतर्कता
ओंकार हत्ती मंगळवारी सकाळी तोरसे, दुसगीतळे या भागातून राष्ट्रीय महामार्गावर पोहोचला. तेथे काही लोकांना दिसल्यावर त्यांनी याची माहिती वन अधिकाऱ्यांना दिली. त्यांनी तातडीने पाहणी केली. त्यावेळी हत्ती कडशी-मोपा धनगरवाडी रस्त्यावर घुटमळत असल्याचे दिसले. त्यामुळे पोलिसांच्या मदतीने रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला.
अनेकांचा खोळंबा
तोरसेनजीक रस्ता बंद करण्यात आल्यामुळे शालेय विद्यार्थी, कामगारांसह इतर नागरिक कडशी मोपा अडकून पडले. जे लोक कामाला गेले होते, त्यांना कडशी मोपा धनगरवाडी येथे आपल्या घरी पोहोचता आले नाही. दुपारी १२ वाजेपर्यंत लोकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वनाधिकारी, पोलिस, वाहतूक अधिकारी, वीज खात्याचे कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.
अधिकाऱ्यांचा सीमेवर पहारा
दोडामार्ग आणि तिलारी परिसरातून आलेला 'ओंकार' हत्ती आता बांदा- नेतर्डे भागात शनिवार, १३ सप्टेंबर पोहोचला होता. नेतर्डे-धनगरवाडी येथील पाणवठ्याजवळ हा हत्ती स्थिरावल्याची होता.
वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह जलद कृती दलाचे जवान हत्तीच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते. गेल्या काही दिवसांपासून दोडामार्गच्या घोटगे आणि मोर्ले परिसरात वावर असलेला हा हत्ती कळणे, उगाडे, डेगवे मार्गे डोंगरपाल भागात आला आणि त्यानंतर नेतर्डे परिसरात स्थिरावला होता.
तसेच गोवा वन विभागाचे पथकही सीमा भागावर आहेत. वन विभागाच्या या कामात स्थानिक ग्रामस्थही मदत करत आहेत. वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.