म्हापशातील १०० वर व्यापाऱ्यांना वीज खात्याच्या नोटिसा

By Admin | Updated: November 10, 2015 01:39 IST2015-11-10T01:39:27+5:302015-11-10T01:39:39+5:30

म्हापसा : म्हापसा बाजारपेठेतील सुमारे १०० हून अधिक व्यापाऱ्यांना वीज खात्याने नोटिसा पाठवल्या आहेत. आग

Electricity Notice Notices to 100 Merchants at Mapusa | म्हापशातील १०० वर व्यापाऱ्यांना वीज खात्याच्या नोटिसा

म्हापशातील १०० वर व्यापाऱ्यांना वीज खात्याच्या नोटिसा

म्हापसा : म्हापसा बाजारपेठेतील सुमारे १०० हून अधिक व्यापाऱ्यांना वीज खात्याने नोटिसा पाठवल्या आहेत. आग लागण्याचे प्रकार वाढल्यानंतर वीज खात्याने येथील पुरवठा सुरळीत करण्यासाठी हातात घेतलेल्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून या नोटिसा पाठवल्या आहेत. वीज खात्याचे साहाय्यक अभियंता नॉर्मन आथाईड यांनी सोमवारी
(दि.९) ही माहिती दिली.
मागील महिन्यात बाजारपेठेतील एका दुकानाला भल्या पहाटे आग लागल्यानंतर वाढत जाणाऱ्या या घटनांची वीज खात्याने गंभीर दखल घेतली आहे. व्यापाऱ्यांना देण्यात आलेल्या कनेक्शनची तपासणी करण्यात आली होती. त्यातील सुमारे १०० हून अधिक व्यापाऱ्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. देण्यात आलेल्या नोटिसांना उत्तर देण्यासाठी एका महिन्याची मुदत खात्याने दिली आहे.
या नोटिसीत मीटर बॉक्स दुकानाबाहेर लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. नव्याने अर्थिंग करण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच नवीन कनेक्शन देताना दर्जात्मक वायर्स वापरण्याची सक्ती केली असून अर्थ लिकेज सर्व्हिस ब्रेकर ही यंत्रणा बसवण्याची सक्ती करण्यात आली आहे. तशी माहिती आथाईड यांनी दिली. अशा प्रकारची उपाययोजना हाती घेतल्यास आग लागण्याच्या प्रकारावर नियंत्रण येऊ शकते. तसेच वीजही वाचू शकते, असेही ते म्हणाले.
वीज मीटर दुकानाबाहेर लावण्यास काही व्यापाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. मीटर बाहेर लावल्यास चोरांचे फावणार असून मीटरमधील वीजपुरवठ्याचा ते गैरवापर करतील व दुकानात चोऱ्या वाढतील, अशी भीती काही दुकानदारांनी व्यक्त केली आहे. व्यक्त केलेली भीती लिखित स्वरूपात देण्याच्या त्यांना सूचना करण्यात आल्याचे आथाईड म्हणाले.
म्हापसा बाजारपेठेतील एक व्यापारी किरण शिरोडकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, खात्याने केलेली सूचना योग्य असून आपण त्यावर अंमलबजावणी करणार असल्याचे ते म्हणाले. बाजारपेठेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची सुरक्षा महत्त्वाची असल्याने उपाययोजना करणे गरजेचे असल्याची माहिती त्यांनी दिली.
मागील महिन्यात आग लागण्याची घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बाजारपेठेला भेट देऊन पाहणी केली होती. या वेळी येथील सुरक्षेचा त्यांनी आढावा घेतला होता. त्यानंतर त्यांनी बाजारात वाढणाऱ्या गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यास पावले उचलण्याचे आदेशही दिले होते. (खास प्रतिनिधी)

Web Title: Electricity Notice Notices to 100 Merchants at Mapusa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.