१५ डिसेंबरपासून पणजीतील रस्त्यांवर धावणार इलेक्ट्रिक बस
By पूजा प्रभूगावकर | Updated: November 14, 2023 13:30 IST2023-11-14T13:27:48+5:302023-11-14T13:30:58+5:30
बसस्थानक ते गोवा विद्यापीठ बससेवा सुरु.

१५ डिसेंबरपासून पणजीतील रस्त्यांवर धावणार इलेक्ट्रिक बस
पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: १५ डिसेंबर पासून पणजीतील सर्व रस्त्यांवर कदंबाच्या इलेक्ट्रीक बसेस धावतील अशी माहिती कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास नाईक तुयेकर यांनी दिली.
पणजी बसस्थानक ते गोवा विद्यापीठ दरम्यान महामंडळाने दोन इलेक्ट्रीक बसेसची सेवा सुरु केली आहे. या बसेसच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. स्मार्ट सिटी अंतर्गत पणजीसाठी ४८ इलेक्ट्रीक बसेस मंजुर झाल्या असून त्यापैकी ३२ बसेस दाखल झाल्याचेही त्यांनी सांगितले.
तुयेकर म्हणाले, की कदंब महामंडळाला सध्या २०० बसेस कमी पडत आहेत. त्यामुळे बसेसची संख्या वाढवण्यावर भर दिला जात आहे. माझी बस योजना सध्या केवळ दक्षिण गोव्यात कार्यरत असून उत्तर गोव्यात या योजने अंतर्गत बसेसची नोंदणी करण्यासाठी काही खासगी बसमालकांनीइच्छा व्यक्त केली आहे. त्यानुसार लवकरच ही योजना उत्तर गोव्यातही सुरु होण्याची अपेक्षा आहे. कदंबा ने आता पर्यंत ५२ जुन्या बसेस स्क्रॅप केल्या आहेत. पणजीत खासगी बसेसही कार्यरत असल्याने त्यांना सांभाळूनच शहरात इलैक्ट्रीक बसेस सुरु केल्या जातील असे त्यांनी सांगितले.