Election Results Live - गोव्यात सत्ता समीकरणाचा सस्पेन्स, काँग्रेस आघाडीवर
By Admin | Updated: March 11, 2017 09:36 IST2017-03-11T09:07:49+5:302017-03-11T09:36:49+5:30
गरज भासल्यास भाजपाला साथ देण्याची महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने तयारी दाखवल्याने गोव्यातल्या सत्ता समीकरणाचा सस्पेन्स वाढला आहे

Election Results Live - गोव्यात सत्ता समीकरणाचा सस्पेन्स, काँग्रेस आघाडीवर
>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 11 - उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला काँग्रेसने सहा जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपा दोन जागांवर आघाडीवर आहे. गोव्यात नेमकं काय होत याकडेही सर्वांचं लक्ष असून भाजपा पुन्हा एकदा सत्तेवर येते का नाही हे पाहावं लागणार आहे. विशेष म्हणजे भाजपाला शह देण्यासाठी शिवसेनेनं महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाशी युती केली होती. त्यामुळे गोव्यात किंगमेकर नेमका कोण होणार हे पाहणं महत्वाचं आहे. दुसरीकडे सरंक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
निकाल हाती येण्याआधी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मंदिरात जाऊन देवदर्शन घेतलं. यावेळी बोलताना देवाची इच्छा असेल तर पुन्हा नक्कीच मुख्यमंत्री होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर दुसरीकडे गरज भासल्यास भाजपाला साथ देण्याची महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने तयारी दाखवल्याची माहिती सूत्रांनी दिली असल्याने गोव्यातल्या सत्ता समीकरणाचा सस्पेन्स वाढला आहे.
40 सदस्यांच्या गोवा विधानसभेमध्ये बहुमतासाठी 21 जागा आवश्यक आहेत. इंडिया टीवी सी वोटरच्या अंदाजानुसार गोव्यामध्ये भाजपाला 15 ते 21, काँग्रेसला 12 ते 18 आणि आम आदमी पक्षाला 4 जागा मिळतील असा अंदाज आहे. अन्य पक्षांना 2 ते 8 जागा मिळतील. त्यामुळे सत्ता स्थापनेमध्ये छोटया पक्षांना महत्व येणार आहे. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष, गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेना या तीन पक्षांनी आघाडी करुन निवडणूक लढवली आहे.
गोव्यात एकूण 40 जागा आहेत. सध्या भाजपकडे 21 जागा आहेत. तर काँग्रेसकडे 7 जागा. त्यामुळे आता या निवडणुकीत गोवेकर कोण्याच्या पारड्यात आपलं वजन टाकणार हे पाहावं लागेल.