पणजी : भारती निवडणूक आयुक्त अशोक लवासा हे आज 28 रोजी गोवा भेटीवर येत आहेत. दोन दिवस ते गोव्यात असतील. उद्या शनिवारी ते दोन्ही जिल्हाधिका-यांसोबत आणि मुख्य निवडणूक अधिका-यांसोबत बैठक घेणार आहेत. अशोक लवासा हे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) 1980 सालच्या बॅचचे निवृत्त अधिकारी आहेत. ते हरयाना केडरमधील आहेत. देशाच्या दोन केंद्रीय निवडणूक आयुक्तांमध्ये त्यांचा समावेश आहे.केंद्र सरकारच्या सेवेत यापूर्वीच्या काळात त्यांनी वित्त सचिव, पर्यावरण सचिव आदी पदांवर काम केलेले आहे. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी इंग्रजीमध्ये एमएची पदवी प्राप्त केलेली आहे. ते एमबीए शिक्षितही आहेत. आयएएस अधिकारी म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी दिल्ली विद्यापीठात साहित्य विषय शिकविण्याचे काम केले होते. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये त्यांनी प्रोबेशनरी अधिकारी म्हणूनही काम केलेले आहे. अशोक लवासा हे प्रथमच गोव्यात निवणूकविषयक कामासाठी येत आहेत. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वेळापत्रक ठरविण्यापूर्वी देशभर निवडणूक आयुक्त जात आहेत.गोव्यात लवासा हे मांद्रे व शिरोडा या दोन मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका अगोदर घेता येतील काय याचीही चाचपणी करून पाहतील, असे सूत्रांनी सांगितले. आज शुक्रवारी रात्री ते येथे दाखल होतील. शनिवारी दिवसभर त्यांच्या बैठका होतील. गोव्याची मतदार यादी, गोव्यातील विद्याथ्र्याच्या परीक्षेच्या वेळा, येथील सण-उत्सवांचे दिवस या सर्वाचा आढावा ते जिल्हाधिकारी व मुख्य निवडणूक अधिका-यांकडून घेतील, असे सूत्रांनी स्पष्ट केले. जर पोटनिवडणुका फेब्रुवारीत झाल्या तर गोव्यात पाच महिने निवडणूक आचारसंहिता असेल अशा प्रकारची चर्चा प्रशासकीय पातळीवर सुरू आहे.
निवडणूक आयुक्त अशोक लवासा आज गोव्यात, उद्या बैठका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 21:02 IST