आजपासून निवडणूक आचारसंहिता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2017 02:28 IST2017-05-18T02:25:56+5:302017-05-18T02:28:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : ११ जून रोजी होणाऱ्या पंचायत निवडणुकीची आचारसंहिता गुरुवार, दि. १८ मेपासून लागू होणार आहे. त्याचबरोबर उमेदवारी

आजपासून निवडणूक आचारसंहिता
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : ११ जून रोजी होणाऱ्या पंचायत निवडणुकीची आचारसंहिता गुरुवार, दि. १८ मेपासून लागू होणार आहे. त्याचबरोबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू होत आहे.
उमेदवारी अर्ज १८ मेपासून २५ मेपर्यंत संबंधित तालुका स्तरावरील मामलेदारांच्या कार्यालयात सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत स्वीकारले जाणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त आर. के. श्रीवास्तव यांनी दिली. अर्जांची छाननी २६ व २७ मे असे दोन दिवस होणार आहे. २९ मे रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत असून त्या दिवशी एकूण उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार असल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले. मतमोजणी १३ जून रोजी संबंधित तालुक्यात घेण्यात येणार आहे.
अर्जासोबत सर्वसाधारण गटातील अर्जदाराला १०० रुपये, तर राखीव गटातील उमेदवाराला ५० रुपये जमा करावे लागणार आहेत. तसेच राखीवतेतून अर्ज करणाऱ्या उमेदवाराला जातीला दाखला दाखवणे गरजेचे आहे. उमेदवारांना ३० चिन्हांतून निवडणूक चिन्ह देण्यात येणार आहे.
१५२२ प्रभागांवर नवीन पंच मंडळ निवडण्यासाठी होणाऱ्या निवडणुकीची
तयारी सुरू असल्याचे श्रीवास्तव म्हणाले. दोन्ही जिल्हाधिकारी स्तरावर तसेच
पोलीस अधीक्षकांच्या स्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली
आहे. आचारसंहितेच्या काळात कायदा
व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस महासंचालक तसेच दोन्ही अधीक्षकांसोबत बैठकाही घेण्यात आल्याची माहिती
त्यांनी दिली.
मतदानाच्या दिवशी पावसाची शक्यता असल्याने त्याचा परिणाम मतदानावर होऊ नये यासाठी निवडक मतदान केंद्रांवर मंडपाची सोय करण्यात येणार आहे.
निवडणुकीसाठी अंदाजे ५ कोटी ५० लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती श्रीवास्तव यांनी दिली. सरकारने या खर्चाला मान्यता दिली आहे.