शैक्षणिक धोरण भारत केंद्रित असावे
By Admin | Updated: June 14, 2015 01:54 IST2015-06-14T01:54:22+5:302015-06-14T01:54:23+5:30
पणजी : देशाचे शैक्षणिक धोरण हे भारत केंद्रित असावे, असे मत विद्या भारती संस्थेचे अखिल भारतीय सचिव अवनिश भटनागर यांनी पणजी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

शैक्षणिक धोरण भारत केंद्रित असावे
पणजी : देशाचे शैक्षणिक धोरण हे भारत केंद्रित असावे, असे मत विद्या भारती संस्थेचे अखिल भारतीय सचिव अवनिश भटनागर यांनी पणजी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
आतापर्यंत भारत केंद्रित शैक्षणिक धोरण असे कधी बनविण्याचा प्रयत्नच झाला नाही. भारतीयत्वाची जोड असलेले आणि भारतीयत्व मूळ असलेले शैक्षणिक धोरण तयार करण्याची गरज आहे. अद्ययावत व आधुनिकतेची कास धरतानाच शिक्षणाची पाळेमुळे मात्र या देशातील मातीत रुजलेली पाहिजेत. येथील इतिहास, राष्ट्रपुरुष यांच्याबद्दल नवीन पीढीला माहिती असणे आवश्यक आहे. अन्यथा जागतिकीकरणाच्या युगात आपली ओळख आपणच हरवून बसू, असे ते म्हणाले.
शारीरिक विकास आणि बौद्धिक विकास हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. विद्याभारती शिक्षण पद्धती अशा प्रकारच्या शैक्षणिक सूत्रांवर आधारित असल्याचे त्यांनी सांगितले.
गोव्यासारख्या राज्यात अनेक शिक्षण संस्था, व्यवस्था निकाल केंद्रित झाल्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी निदान चर्चा तरी सुरू झाली, ही समाधानाची बाब आहे.
शिक्षण व्यवस्था करणे, हे पैसे कमावण्यासाठीचे माध्यम असे विद्याभारती मानत नाही. गोव्यातही विद्याभारतीचे काम याच तत्त्वावर व योग्य पद्धतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस विद्याभारतीचे क्षेत्रीय पदाधिकारी दिलीप बेतकीकर उपस्थित होते. संस्थेच्या गोव्यात शिशुवाटिका, प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळाही चालू आहेत. (प्रतिनिधी)