धोबी नसल्यानेही अडतात शस्त्रक्रिया गोमेकॉत दुर्दशा
By Admin | Updated: May 22, 2014 18:27 IST2014-05-22T18:27:30+5:302014-05-22T18:27:43+5:30
कपडे धुण्याबाबत वाद; कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने समस्या

धोबी नसल्यानेही अडतात शस्त्रक्रिया गोमेकॉत दुर्दशा
धोबी नसल्यानेही अडतात शस्त्रक्रिया गोमेकॉत दुर्दशा : कपडे धुण्याबाबत वाद; कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने समस्या पणजी : धोबी नसल्याने रुग्ण व डॉक्टरांना स्वच्छ कपडे नाहीत आणि कपडे नसल्याने शस्त्रक्रिया अडून पडतात, असे एखाद्या शासकीय इस्पितळात घडू शकते का? बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात अशा प्रकारचा अनुभव काही वेळा येतो. आता तर तिथे कपडे तुंबले असून ते धुण्यासाठी कर्मचारी शोधण्याची व त्यांना विनवण्या करण्याची वेळ गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या (गोमेकॉ) व्यवस्थापनावर आली आहे. गोमेकॉसह सर्वच शासकीय इस्पितळांवर बोजा वाढत आहे. गोमेकॉत दाखल होणार्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने रोज कपड्याचे ढिग तयार होत आहेत. कपडे धुणारे कर्मचारी गैरहजर राहिले, तर स्वच्छ कपडे उपलब्ध होत नाहीत व त्यामुळे गोमेकॉत शस्त्रक्रियाही पुढे ढकलण्याची वेळ येते. सध्या कपडे तुंबले असून मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने म्हापसा येथील शासकीय इस्पितळातील तिघा कर्मचार्यांनी गोमेकॉत कपडे धुण्यासाठी जावे, असा आदेश वरिष्ठ अधिकार्यांनी दिला आहे. मात्र, कर्मचारी जाण्यास तयार नाहीत. जी कामे आम्ही करायची नाहीत, ती देखील आम्हाला करायला सांगितली जातात; पण सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार वेतनश्रेणी मात्र आम्हाला लागू केली जात नाही, असे काही कर्मचार्यांचे म्हणणे आहे. हाड मोडलेल्या रुग्णासाठी प्लास्टरिंग करण्याचे कामही आम्हालाच सांगितले जाते, असेही कर्मचार्यांचे म्हणणे आहे. गोमेकॉकडे सध्या रक्ताचे डाग वगैरे पडलेले कपडे धुण्यासाठी मनुष्यबळ कमी आहे. (खास प्रतिनिधी)