अवकाळी वृष्टीमुळे आरोग्याच्या समस्या शक्य
By Admin | Updated: May 12, 2014 00:21 IST2014-05-12T00:20:17+5:302014-05-12T00:21:13+5:30
अवकाळी वृष्टीमुळे आरोग्याच्या समस्या शक्य

अवकाळी वृष्टीमुळे आरोग्याच्या समस्या शक्य
पणजी : राज्यात अचानक सुरू झालेल्या पावसामुळे मलेरियाच्या डासांची पैदास होण्याची शक्यता वाढत आहे. मलेरियाच्या डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी दक्षता घेण्याची आवश्यकता असून, घरासभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवण्याकडे भर द्यावा. पूर्व पावसामुळे आरोग्यात बिघाड होण्याची शक्यता आहे, असे आरोग्य खात्यातर्फे कळविण्यात आले आहे. मलेरियाच्या डासांच्या पैदासीबरोबरच खोकला, थंडी, घसा खवखवणे घसा बसणे इत्यादी आजार वाढू शकतात. उन्हाळ्याच्या दिवसांत पावसाचे थंड वातावरण आणि पाऊस पडून गेल्यावर वातावरणात येणार्या उष्णतेमुळे अनेक आजारांचा फैलाव होऊ शकतो. नागरिकांनी यासाठी पिण्याचे पाणी उकळून घेण्यापासून ते स्वच्छ गरम अन्नाचे सेवन करण्यासारखी पथ्ये पाळावीत. खोकला, थंडी अशा आजारांतही वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आरोग्य खात्याचे अधिकारी डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी सांगितले. बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, ताप येणे, डोके दुखणे, डोळ्यांना त्रास होणे, असे प्रकार घडू शकतात. राज्यात हल्लीच्या दिवसांत कांजिण्याचे बरेच रुग्ण आढळले होते. अशा वातावरणात कांजिण्यासारखा रोग खूप जलद गतीने पसरण्याची शक्यता असते. सांसर्गिक रोगांचे प्रमाण वाढू लागते. अशा वातावरणात मुलांची जास्त काळजी घ्यावी. फळे, भाज्या इत्यादी स्वच्छ धुवून खाव्यात. हात स्वच्छ धुवूनच खाद्यपदार्थ खावेत. पूर्व पावसाळ्यामुळे होणार्या आजारांपासून सुरक्षित राहाण्यासाठी योग्य काळजी घ्यावी. कोणताही आजार झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अशी माहिती डॉ. बेतोडकर यांनी दिली. पावसाळ्याच्या हंगामापूर्वीच आलेला हा पाऊस मलेरियाच्या डासांसाठी उपयुक्त ठरणारा आहे. नागरिकांनी घरासभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवावा. त्याचबरोबर नगरपालिका, ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींनीही आपापल्या मतदारक्षेत्रात मलेरियाच्या डासांची पैदास होऊ नये म्हणून स्वच्छता राखण्यास हातभार लावावा. पावसाचे पाणी खड्डे, प्लास्टिकच्या बाटल्या, रस्त्यानजीक टाकलेल्या शहाळ्या, टायर, कुळागरात असणार्या सुपार्यांच्या पोया यात पाणी साचून राहिल्यामुळे मलेरियाच्या डासांना अळी घालण्यास उपयुक्त ठरतात. याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे, अन्यथा मलेरियाचा फैलाव त्वरेने होऊ शकतो, असे आरोग्य खात्याचे अधिकारी डॉ. सचिन गोवेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)