किनाऱ्यांवरील प्लास्टिक कचऱ्यामुळे गोव्यात सागरी जीव संपत्तीला धोका
By Admin | Updated: July 14, 2016 18:41 IST2016-07-14T18:41:21+5:302016-07-14T18:41:21+5:30
गोव्यातील किनाऱ्यांवरील प्लास्टिक कचऱ्यामुळे सागरी जीव संपत्तीला धोका निर्माण झाला असल्याचे येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या

किनाऱ्यांवरील प्लास्टिक कचऱ्यामुळे गोव्यात सागरी जीव संपत्तीला धोका
- एनआयओ शास्रज्ञांकडून सहा किनाऱ्यांचा अभ्यास
पणजी : गोव्यातील किनाऱ्यांवरील प्लास्टिक कचऱ्यामुळे सागरी जीव संपत्तीला धोका निर्माण झाला असल्याचे येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाहत येऊन किनाऱ्यांवर धडकणारा प्लास्टिक कचरा धोकादायक बनला आहे. केरी, वागातोर, कळंगुट, कोलवा, मोबोर व गालजीबाग किनाऱ्यांचा अभ्यास सहा किनाऱ्यांचा अभ्यास केल्यानंतर शास्रज्ञांनी हे अनुमान काढले आहे.
एनआयओ शास्रज्ञांनी नुकताच यासंबंधीचा अहवाल प्रकाशित केला. त्यात असे म्हटले आहे की, प्लास्टिक कचऱ्याबरोबरच समुद्रात जहाजांमधून अपघाताने होणारी तेल गळती यामुळेही किनारी पर्यावरणाला धोका निर्माण झालेला आहे. मायक्रोप्लास्टिक पॅलेटस्मुळे निर्माण झालेला धोका यावर या संशोधन अहवालात भाष्य करण्यात आले आहे. या पॅलेटसची रासायनिक प्रक्रिया तसेच मान्सूनमध्ये होणाऱ्या अन्य परिणामांचा अभ्यास करण्यात आला आहे.
राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेतील शास्रज्ञ माहुआ साहा, एस. वीरसिंगम, व्ही. सुनील, पी. वेथामोनी, अँड्रिया कार्मेलिता रॉड्रिग्स, सौरव भट्टाचार्य व बी.जी. मलिक यांनी या संशोधन कार्यात भाग घेतला.
मान्सूनमध्ये समुद्रातील प्रवाहामुळे कचरा वाहत येऊन किनाऱ्यांना लागण्याचे प्रकार घडतात. समुद्रात अपघाताने जहाजातून तेल गळती होते. प्लास्टिक फिल्म, फायबर, फ्रॅगमेंटसही वाहत येतात. समुद्रातून वाहत येणारा प्लास्टिक कचरा आढळून आला तरी राज्यातील खाडींमध्ये असे आढळले नाही.