लोंढा-वास्को रेल्वेमार्गही दुपदरी
By Admin | Updated: December 7, 2015 01:38 IST2015-12-07T01:37:56+5:302015-12-07T01:38:09+5:30
पणजी : लोंढा-वास्को रेल्वेमार्गाचेही दुपदरीकरण केले जाईल. त्यासाठीचे सर्वेक्षणही पूर्ण झाले आहे. या कामास लवकरच प्रारंभ

लोंढा-वास्को रेल्वेमार्गही दुपदरी
पणजी : लोंढा-वास्को रेल्वेमार्गाचेही दुपदरीकरण केले जाईल. त्यासाठीचे सर्वेक्षणही पूर्ण झाले आहे. या कामास लवकरच प्रारंभ होईल, असे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रविवारी येथे जाहीर केले.
मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस डबल डेकर जलदगती रेलसेवेचा रविवारी प्रारंभ झाला. केंद्रीय मंत्री प्रभू, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर, आमदार विष्णू वाघ यांनी हिरवा बावटा दाखवून रेल्वे गाडीचा प्रारंभ केला. कला अकादमी संकुलात हा सोहळा सायंकाळी पार पडला. रिमोटच्या साहाय्याने रेलसेवेचा प्रारंभ करण्यात आला.
या वेळी केंद्रीय मंत्री प्रभू म्हणाले, की गोव्याचे मुख्यमंत्री पार्सेकर यांनी गोव्यासाठी जे जे मागितले ते सर्व आम्ही दिले. यापुढेही खास पर्यटन मोसमावेळी विशेष रेल्वे गाड्या सोडता येतील. त्याविषयीची गरज पडताळून पाहिली जाईल. गोवा ते तिरुपती अशी रेल्वेसेवाही लवकरच प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली जाईल. रविवारी सुरू झालेली डबल डेकर ही १ हजार प्रवासी क्षमतेची आहे. प्रत्येक कोचमध्ये १२० आसने असतील. कोकण रेल्वेचा डबल ट्रॅक टाकण्याच्या कामास प्रारंभ झाला आहे. लोंढा-वास्को मार्गही दुपदरी केला जाईल.
ते म्हणाले, की गोवा व मुंबईचे नाते जवळचे आहे. देशातील बंदरेही रेल्वेमार्गाने जोडली जाणार आहेत. त्या वेळी गोव्याचाही विचार केला जाईल. गोव्याने देशाला अत्यंत प्रतिभावान माणसे दिली. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर यांच्यासारखे शास्त्रज्ञ दिले. अशा राज्याने काहीही मागितले की, मग आम्ही नकार देऊच शकत नाही.
ते म्हणाले, रेल्वे मंत्रालयाचा कारभार अत्यंत पारदर्शक झाला आहे. हजारो कोटींच्या निविदा पारदर्शक पद्धतीने जारी केल्या गेल्या. यापुढेही आॅनलाईन पद्धतीने सर्व कामांच्या निविदा जारी केल्या जातील. तसेच रेल्वेमध्ये नोकर भरतीही आॅनलाईन केली जाईल. देशातील सर्व राज्यांशी रेल्वे मंत्रालय करार करून संयुक्त कंपनी स्थापन करील. त्या कंपनीमार्फत विविध प्रकल्प हाती घेतले जातील. जपानमध्ये जशी रेल्वे प्रवास सुरक्षा आहे, तशीच भारतातही अमलात आणली जाईल.
केंद्रीय आयुष मंत्रालयाचे मंत्री श्रीपाद नाईक यांचेही भाषण झाले. रेल्वे मंत्रालय कसे कार्यक्षम पद्धतीने चालते हे सुरेश प्रभू यांच्यामुळे कळून येते, असे नाईक म्हणाले. वरिष्ठ अधिकारी संजय गुप्ता यांनी स्वागत केले, तर राजेंद्र प्रसाद यांनी आभार मानले.
(खास प्रतिनिधी)