लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : भारतीय जनता पक्षाचे डबल इंजिन सरकार सर्वसामान्य जनता, शेतकरी व युवांना घेऊन पुढे जात आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात राज्याबरोबरच देशाचाही कायापालट झाला आहे. गरीब माणूस हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या कल्याणासाठी काम करण्यासाठी तसेच हुशार व गरजू विद्यार्थ्यांच्या आधारासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची फार गरज आहे, असे राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.
मये येथे आयोजित भाजप संकल्प सभेत खासदार तानावडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष शंकर चोडणकर, उत्तर गोवा भाजप मंडळ अध्यक्ष दयानंद कार्बोटकर, मये सरपंच वासुदेव गावकर, महिला मोर्चा अध्यक्ष श्रुती जल्मी, शिरगाव सरपंच वेदिका शिरगावकर, स्थानिक पंच दिलीप शेट, मये मंडळ अध्यक्ष संदीप पार्सेकर, वेदान्ताचे अधिकारी आशिष पिळणकर, लक्ष्मण गावस, विवेक सांबरेकर, कारापूर सरपंच संतोष गुरव, प्रेमानंद म्हांब्रे, चोडण सरपंच, महिला समिती अध्यक्ष आरती बांदोडकर, बुथ अध्यक्ष, सरपंच, पंच सदस्य, शक्ती केंद्र प्रमुख व इतर प्रमुख कार्यकर्त्याची उपस्थिती होती.
यावेळी आमदार शेट यांनी पंतप्रधान मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचे कार्यक्रम हाती घेण्यात आले आहे. मये मतदारसंघातील सातही पंचायत क्षेत्रांतील हुशार विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळावी, म्हणूनच विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचा हेतू असल्याचे सांगितले. तसेच गोव्यातही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने पेडण्यापासून काणकोणपर्यंत विकास साधल्याचे आमदार शेट यांनी स्पष्ट केले.
यावेळी मये मतदारसंघात येणाऱ्या सर्व हायस्कूलमधील सुमारे २०० हुशार व गरजू विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच रिलीफ फंडातून गरीब व गरजू कुटुंबातील सदस्यांना अर्थसहाय्याचे धनादेश वितरित करण्यात आले. प्रारंभी शंकर चोडणकर यांनी प्रास्ताविक केले. दयानंद कार्बोटकर यांनी कार्यक्रम हेतू विशद केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास चोडणकर यांनी केले.