राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदी डिसोझांची आठवडाभरात नियुक्ती
By Admin | Updated: June 7, 2015 01:32 IST2015-06-07T01:32:17+5:302015-06-07T01:32:30+5:30
पणजी : गोवा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून माजी मंत्री जुझे फिलिप डिसोझा यांची नियुक्ती करण्याचे पक्षश्रेष्ठींच्या पातळीवर ठरले आहे.

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदी डिसोझांची आठवडाभरात नियुक्ती
पणजी : गोवा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून माजी मंत्री जुझे फिलिप डिसोझा यांची नियुक्ती करण्याचे पक्षश्रेष्ठींच्या पातळीवर ठरले आहे. येत्या आठवडाभरात यासंबंधी नियुक्तीचा आदेशही जारी होण्याची शक्यता आहे.
जुझे फिलिप डिसोझा हे पूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष होण्यास तयार नव्हते. पक्षासाठी खर्च करण्याची त्यांची तयारी नव्हती. तथापि, सुहास वळवईकर हे प्रदेशाध्यक्षपदी नको म्हणून जुझे फिलिप यांच्या नेतृत्वाखाली अनेक पदाधिकाऱ्यांनी बंड केले व शेवटी जुझे फिलिप यांनी आपण प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्यास तयार आहोत, असे मुंबईत झालेल्या बैठकीवेळी राष्ट्रवादीचे केंद्रीय नेते प्रफुल्ल पटेल यांना सांगितले.
देवानंद नाईक, ट्रोजन डिमेलो, सलिम सय्यद आदी बहुतेक पदाधिकारी हे जुझे फिलिप यांच्या बाजूने असल्याचे पटेल यांना मुंबईतील बैठकीवेळी कळाले व त्यांनी जुझे फिलिप यांचे नाव प्रदेशाध्यक्ष म्हणून निश्चित केले.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही पटेल यांनी बोलणी केली असल्याची माहिती खास सूत्रांनी दिली आहे.
जुझे फिलिप डिसोझा यांना प्रदेशाध्यक्ष करण्यास पक्षाचे समन्वयक प्रफुल्ल हेदे व निरीक्षक जाधव हेही तयार झाले आहेत, असे सूत्रांकडून कळते. यापुढे पक्षाच्या गोवा शाखेचा खर्च हा मुंबईहून राष्ट्रवादीच्या कार्यालयातून केला जाणार आहे. पटेल यांनी मुंबईतील बैठकीवेळी तसे सुतोवाच केले.
दरम्यान, जुझे फिलिप डिसोझा यांनी नजीकच्या काळात काँग्रेस पक्षात जाण्याचा विचार सोडून दिला आहे, असे त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष बनल्यानंतर २०१७ सालची निवडणूकही राष्ट्रवादीच्याच तिकिटावर लढवावी, असे जुझे फिलिप यांनी ठरविले आहे. २०१७च्या निवडणुकीवेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची युती होण्याची शक्यता नाही; कारण काँग्रेसला युती नको आहे. (खास प्रतिनिधी)