अन्य पक्षीय कार्यकर्त्यांना दारे खुली; आरजी प्रमुख मनोज परब यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2025 11:44 IST2025-02-09T11:44:19+5:302025-02-09T11:44:34+5:30
दिल्ली येथे मुख्यालय असणाऱ्या भाजप, काँग्रेस, आम आदमी पार्टी यासारख्या राष्ट्रीय पक्षांपासून गोव्याला मुक्त करण्याची गरज आहे.

अन्य पक्षीय कार्यकर्त्यांना दारे खुली; आरजी प्रमुख मनोज परब यांचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :गोवा वाचवण्याची तळमळ असणाऱ्या तसेच गोव्यावर प्रेम असलेल्या राष्ट्रीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना रिव्होल्यूशनरी गोवन्स (आरजी) पक्षाचे दरवाजे खुले आहेत. त्यांनी आमच्या पक्षात प्रवेश करावा, असे आवाहन आरजीचे अध्यक्ष मनोज परब यांनी पत्रकार परिषदेत केले.
दिल्ली येथे मुख्यालय असणाऱ्या भाजप, काँग्रेस, आम आदमी पार्टी यासारख्या राष्ट्रीय पक्षांपासून गोव्याला मुक्त करण्याची गरज आहे. त्यासाठी या पक्षांचे कार्यकर्ते ज्यांना प्रामाणिकपणे गोवा वाचवण्याची इच्छा आहे, त्यांनी आरजीत यावे. आरजी लवकरच त्यादृष्टीने सदस्य मोहीमही सुरू करेल, असे त्यांनी सांगितले.
परब म्हणाले, की दिल्लीत आम आदमी पक्षाचा पराभव झाला व भाजपचा विजय झाला. लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष व काँग्रेसने युती केली होती. मात्र, दिल्लीत दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. गोव्यात सुद्धा या पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप करतात, पण आरजीवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप करतात. यावरून हे पक्ष केवळ स्वार्थाचे राजकारण करीत असल्याचे स्पष्ट होते. गोव्यातील राजकीय पक्ष कमी पडत असल्यानेच कदाचित दिल्लीच्या राजकीय पक्षांना संधी मिळत आहे. मात्र, आरजी पक्ष आता पुन्हा एकदा जोमाने गोवा वाचवण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर उपस्थित होते.
निवडणूक लढवण्याचा अधिकार सर्वांना...
आम आदमी पक्ष असो किंवा काँग्रेस आरजीवर नेहमीच भाजपची बी टीम असल्याचा आरोप करतात. उलट या दोन्ही पक्षांनी दिल्ली निवडणुकीत इंडिया अलायन्स या संकल्पनेचीच थट्टा केली आहे. कारण, त्यांनी जर ही संकल्पना पाळली असती तर एकत्रपणे निवडणूक लढवली असती. निवडणूक निकाल वेगळा लागला असता. निवडणूक लढवण्यावरूनही ते आमच्यावर आरोप करतात. निवडणूक लढण्याचा प्रत्येकाला अधिकार असल्याचे मनोज परब यांनी स्पष्ट केले.