खास दर्जासाठी शक्ती वाया नको!
By Admin | Updated: November 5, 2015 02:13 IST2015-11-05T02:13:45+5:302015-11-05T02:13:56+5:30
पणजी : गोव्याला खास दर्जा मिळाला तर आम्हालाही तो हवाच आहे; पण जी गोष्ट शक्य नाही त्या गोष्टीसाठी शक्ती वाया घालविण्यात अर्थ नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बुधवारी मांडली

खास दर्जासाठी शक्ती वाया नको!
पणजी : गोव्याला खास दर्जा मिळाला तर आम्हालाही तो हवाच आहे; पण जी गोष्ट शक्य नाही त्या गोष्टीसाठी शक्ती वाया घालविण्यात अर्थ नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बुधवारी मांडली.
येत्या रविवारी आपल्या सरकारला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. पार्सेकर म्हणाले की, खास दर्जा मिळणे शक्य नसल्याने त्याविषयी शक्ती वाया घालविणे मला आवश्यक वाटत नाही. गोव्याला खास दर्जा मिळणे म्हणजे जे काही अपेक्षित आहे, त्या गोष्टी आम्ही खास दर्जा न मिळताही करून घेत आहोत. आम्ही गोव्यासाठी केंद्राकडे आर्थिक पॅकेज मागितले नाही; पण केंद्राने पॅकेज न देता हजारो कोटींचे प्रकल्प आम्हाला दिले.
गेल्या वर्षभरात मार्गी लावलेल्या कामांविषयी बोलताना पार्सेकर म्हणाले की, आम्ही अनेक रस्ते, पूल, उड्डाण पूल यांची कामे हाती घेतली आहेत. तीन हजार
कोटी रुपये खर्चाच्या जुवारी पुलासह अनेक रस्ते, त्यांचे रुंदीकरण व काही बायपास यांची कामे यापुढे होणार आहेत. रायबंदर बायपासचे काम या महिन्यात पूर्ण होईल. मिरामार-दोनापावल रस्त्याचे यापूर्वी रेंगाळलेले कामही नजीकच्या काळात
पूर्ण होईल. कोकण रेल्वेचा डबल
ट्रॅक टाकण्याचे कामही मार्गी लागेल. त्यानंतर मोपा विमानतळ ते काणकोण असे अंतर खूप कमी होईल.
मुख्यमंत्री म्हणाले की, आरोग्य, कृषी, पर्यटन, खनिज, पोलीस, शिक्षण या क्षेत्रांतही सरकार चांगले काम करत आहे. ग्रामीण भागातही पर्यटनाची नवनवी दालने आम्ही खुली करू. दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या १ लाख ३० हजार लाभार्थींना प्रत्येकी दोन हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जात आहे. गृह आधार योजनेखाली १ लाख १८ हजार व्यक्तींना १ हजार २०० रुपयांचे अर्थसाहाय्य वितरित केले जाते. लाडली लक्ष्मी योजनेचा आतापर्यंत १४ हजार ५०० मुलींना लाभ मिळाला आहे. सरकारच्या गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने ५३ प्रकल्प मंजूर केले असून त्यापैकी ५० टक्के प्रकल्पांचे काम मार्गी लागत आहे.
(खास प्रतिनिधी)